घरमहाराष्ट्रZeeshan Siddique : काँग्रेसने पदावरून हकालपट्टी केल्याने झिशान सिद्दीकी संतापले

Zeeshan Siddique : काँग्रेसने पदावरून हकालपट्टी केल्याने झिशान सिद्दीकी संतापले

Subscribe

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यामुळे वांद्र पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी संतापले आहेत. ते आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

मुंबई : काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी काल बुधवारी (ता. 21 फेब्रुवारी) वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली. त्यांच्या जागी आता या पदावर युवक काँग्रेसचे नेते अखिलेश यादव यांची निवड करण्यात आली आहे. परंतु, पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे झिशान सिद्दीकी संतापले आहेत. काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयानंतर आज (ता. 22 फेब्रुवारी) संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. (Zeeshan Siddique was furious after being ousted from the post by the Congress)

हेही वाचा… Rahul Narwekar : विरोधात निर्णय दिल्यास निवडणूक आयोगावरही टीका – राहुल नार्वेकर

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच झिशान यांचे वडील माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडत अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर झिशानही पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु, त्यांनी त्यांचा हा निर्णय जाहीर करण्याआधीच पक्षाने त्यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. झिशान मुंबईत नसताना युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी संघटनेत फेरबदल करत त्यांना पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत झिशान सिद्दीकी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून काढल्यानंतर झिशान सिद्दीकी म्हणाले की, काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयाची मला कोणतीही कल्पना नव्हती. हा निर्णय घेतल्यानंतर मला आश्चर्य वाटले. मी अजमेर शरीफवरून आलो आहे. मला काल या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली. मला कोणताही मेल, किंवा मेसेज मिळालेला नाही. मी 12 वर्ष काँग्रेस पक्षासाठी दिलेले आहेत. मला पदावरून हटवायचेच होते तर त्यांनी मला थेट संपर्क करायला हवा होता. मात्र त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे. मला समाजमाध्यमांमार्फत समजलेले आहे.

- Advertisement -

तर, मी आता माझ्या जवळच्या लोकांशी याबाबत बोलणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषदेतून माझी भूमिका स्पष्ट करेल. माझ्यावर काय अन्याय झालेले आहे?, नेमके काय घडलेले आहे? ते मी या पत्रकार परिषदेत सांगणार आहे. मला पदावरून का हटवण्यात आले याची मला कोणतीही कल्पना नाही. मला साधारण 90 हजार लोकांनी मतदान केले होते. त्यानंतरच मला मुंबईच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मला या 90 हजार लोकांना आता उत्तर द्यावे लागेल, असेही झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.

अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात एकाच कुटुंबातील लोक वेगवेगळ्या पक्षाशी जोडलेले असतात. मी तर काँग्रेस पक्ष सोडण्याचा कधी विचार केला नाही. मी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची त्यांना शंका असेल तर त्यांनी माझ्याशी याबाबत चर्चा करायला हवी होती. त्यांनी मला विचारायला हवे होते. मी काँग्रेस पक्षाच्या बैठकांना हजेरी लावली. त्यानंतर अनेकांनी माझे कौतुक केले. मात्र आता माझ्यासोबत जे झाले आहे, ते मी सांगणार आहे, असे म्हणत झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -