Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रZeeshan Siddiqui: काँग्रेसमध्ये भेदभाव, मी मुसलमान म्हणून...;सिद्दीकींचा आरोप

Zeeshan Siddiqui: काँग्रेसमध्ये भेदभाव, मी मुसलमान म्हणून…;सिद्दीकींचा आरोप

Subscribe

मुंबई: काँग्रेसचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेतृत्त्वानं आमदार झीशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून हटवलं आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसमधील राजकारण आणखी पेटल्याचं दिसून येत आहे. झीशान सिद्दीकी यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस पक्षावर अनेक आरोप केले आहेत. (Zeeshan Siddiqui Discrimination in Congress I as a Muslim Siddiqui s allegations after being removed from the post of President)

मला मुंबई युवक काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून हटवलं हे दुर्दैवी आहे. काँग्रेसमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत आहे. काँग्रेसला आमची किंमत नाही. मी मुंबई युवक काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून आलो. तरीदेखील मला 8 ते 10 महिने अध्यक्ष पद देण्यात आलं नाही. त्या दिवसांत मला खूप ब्लॅकमेल करण्यात आलं, असाही गंभीर आरोप सिद्दीकी यांनी केला आहे.

काय म्हणाले झीशान सिद्दीकी?

माझे वडील राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले, मात्र तरीही मी काँग्रेसमध्येच आहे, हे मी वारंवार सांगितलं. तरीदेखील माझ्या विरोधात मुंबई प्रदेश युवक काँग्रेस पदावरून हटवण्याची कारवाई केली गेली. मी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या बैठकीतही हजेरी लावली होती. मुंबई युवक काँग्रेसची निवडणूक लढून मी जिंकून आलो होतो. मला त्यावेळी 90 टक्के मते मिळाली होती. मात्र, जिंकल्यानंतरही मला युवक काँग्रेस अध्यक्षपदावर नियुक्त होण्याकरता 9 ते 10 महिने लागले.

कर्नाटक युवक काँग्रेसबाबतीतही असंच झालं. तो मुसलमान असल्याने त्याच्याबाबतही तसंच झालं. मला दु:ख होतंय की काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांकांना स्थान नाही. दोन मुसलमान उमेदवारांना चांगली मते मिळूनही युवक काँग्रेसचे पद देण्यात आले नाही. काँग्रेस नेहमी मुसलमान समुदायाबाबत सकारात्मकतेने बोलत असते. मात्र तसं वागत नाही.

मुसलमान लोक टीममध्ये घेऊ नको, असं मला सांगण्यात आलं होतं. मुंबई काँग्रेसची लिस्ट काढून बघा, किती वरिष्ठ नेतेपदी मुसलमान आहेत? जर काँग्रेसला अल्पसंख्यांकांची किंमत नसेल तर आम्हालाही आमचे पर्याय शोधावे लागतील. मी काँग्रेस पक्षात यापुढे राहीन, असं म्हणणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांसोबत बोलून, चर्चा करून मी माझा राजकीय पर्याय शोधेन, असं झीशान सिद्दीकी म्हणाले.

(हेही वाचा: Uddhav Thackeray : गद्दारांना पन्नास खोक्यांचा हमीभाव, पण…; शेतकरी प्रश्नांवर ठाकरेंचा संताप)