झेडपी सीईओची आरोग्य केंद्राला ‘सरप्राइज विजिट’; गैरहजर अधिकाऱ्यावर ‘ऑन द स्पॉट’ कारवाई

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बागलाण तालुक्यातील आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र ताहराबाद, प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्हेर, उपकेंद्र अंतापुर येथे भेट देवून पाहणी केली. यावेळी मुल्हेरच्या महिला आरोग्य अधिकारी या विनाकारण गैरहजर असल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला असल्याची माहिती सीईओ आशिमा मित्तल यांनी दिली. यावेळी सीईओंनी उपस्थित रुग्ण, गरोदर माता यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांकडून दिल्या जाणार्‍या आरोग्य सुविधेबाबत माहिती घेतली.

मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्हेर येथे प्रसुतीगृह, शस्त्रक्रिया गृह यांची पाहणी केली. उपस्थित अधिकार्‍यांकडून दररोज किती रुग्ण तपासणी केली जाते, मागील दिवसांमध्ये किती रुग्णांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले याबतची माहिती घेतली त्याचबरोबर आरोग्य केंद्राच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी गट विकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल महाजन यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दोन दिवसांपुर्वी त्र्यंबक तालुक्यातील अंजनेरी येथे प्राथमिक आरोग्य केेंद्रात महिला प्रसुतीसाठी आली असतांना वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याकारणाने मोठा गहजब माजला. शेजारी राहणार्‍या सुईनबाईला बोलावुन तिच्या मदतीने महिलेच्या आईने महिलेची प्रसुती केली. बाळ आणि आई जरी सुरक्षित असले तरी महिलेच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही दखल घेत आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश आरोग्य संचालकांना दिले होते.

माध्यमांनी हा विषय प्रकर्षाने उचलुन धरला. घडलेल्या प्रकाराची सीईओ मित्तल यांनीही गंभीर दखल घेत वैद्यकीय अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई सुरु केली. यानंतर आरोग्य केंद्रांच्या अधिकारी कर्मचार्‍यांना धाक निर्माण व्हावा, केंद्राचे कामकाज नियमितपणे चालावे या हेतुने सरप्राईज व्हिजीट देणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. यानंतर सीईओ मित्तल अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्या असुन त्यांनी बागलाण तालुक्यातील मुल्हेर, अंतापूर, ताहराबाद आरोग्य केंद्रांना भेटी देत पाहणी केली.