अन्न हा आपल्या जीवनातला मुख्य घटक असून आपण जे काही खातो त्याचे बरे वाईट परिणाम आपल्या शरीराबरोबरच मनावरही होतात. यामुळे नेहमी ताजे, स्वच्छ अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला तज्ज्ञ आपल्याला देतात. पण सध्याच्या फास्ट फूड कल्चरमुळे जंक आणि प्रोसेस्ड, फ्रोजन फूड खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र हे जंक, पॅकेटबंद फूड कितीही टेस्टी असले तरी त्यांचे अनेक दुष्परिणाम शरारीवर होतात. यामुळे साध्या आजारापासून ते गंभीर आजार होण्याचा धोकाही अनेकपटीने वाढतो.
फास्ट फूडमध्ये कॅलरीजचे प्रमाण सर्वाधिक असते. यामुळे वजन वेगाने वाढते. पण त्याचबरोबर या पदार्थांमुळे हृदयाशी संबंधित आजारही बळावतात. यामुळे हेल्थी राहण्यासाठी अशा जंक फूड्पासून दूर राहणे गरजेचे आहे. बर्गर, फ्राईज यासारख्या पदार्थांमध्ये तेलाबरोबरच कार्बचे प्रमाणही जास्त असल्याने मधुमेह आणि ब्लड प्रेशरसारख्या व्याधी जडतात.
ताण, तणाव, अपुरी झोप , ही ब्लड प्रेशरची प्रमुख कारणं जरी असली तरी तुम्ही जे काही पदार्थ खाता त्यांचाही थेट संबध तुमच्या ब्लड प्रेशरबरोबरही असतो. कारण काहीवेळा आपण असा काही पदार्थ खातो ज्यामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. सोडियममुळे हायपरटेंशनचा धोकाही दुप्पटीने वाढतो. यामुळे डॉक्टर रुग्णांना मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात. पदार्थातील सोडियम फक्त ब्लड प्रेशरच वाढवत नाही तर रक्त वाहीन्यांनेही नुकसान करतो. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोकाही वाढतो .
फास्ट फूड आणि पाकिटबंद पदार्थ अधिक काळ फ्रेश राहावे यासाठी काही रासायनिक प्रक्रिया करण्यात येतात. यामुळे त्यात कार्बचे प्रमाण अधिक असते. हे पदार्थ खाल्ल्याने शुगर वाढते. त्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. किडनीवर त्याचा परिणाम होतो. हृदयविकार, स्ट्रोकचा धोकाही वाढतो.