गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण उत्सवांपैकी एक आहेत. मात्र, गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती यात नेमका फरक काय आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. या प्रसंगी गणेशाचा जन्म झाला असं काही लोक मानतात. पण खरंच असं आहे का? यामागे काही पौराणिक कहाणी आहे का? याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती कधी साजरी केली जाते?
गणेश चतुर्थी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात (मराठी महिना – भाद्रपद) साजरी केली जाते तर गणेश जयंती माघ महिन्यात येते जी इंग्रजी कॅलेंडरनुसार, जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येते. हे दोन्ही शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरे केले जाणारे सण आहेत.
गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी का साजरी केली जाते?
गणेश चतुर्थी, ज्याला विनायक चतुर्थी(शुक्ल पक्ष) किंवा संकष्टी चतुर्थी (कृष्ण पक्ष) म्हणूनही ओळखलं जातं. भगवान गणेशाचे त्याच्या दैवी निवासस्थान कैलासपर्वतापासून ते पृथ्वीवर होणारे वार्षिक आगमन म्हणून भाद्रपदातील गणेश चतुर्थी साजरी केली जाते. पुराणानुसार, असंही म्हटलं जातं की आपला भाऊ भगवान कार्तिकेयाला भेटण्यासाठी गणेशाने कैलास पर्वत सोडला, जिथे देवी पार्वती आणि भगवान शिव राहत होते, कार्तिकेयाच्या भेटीनंतर 11 दिवसांनी गणेश मूळ घरी परतले. याचीच आठवण म्हणून भाद्रपदात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार गणपती बाप्पाचा जन्म गणेश जयंतीच्या दिवशी झाला होता.
गणपतीचा जन्म कोणत्या दिवशी झाला?
धार्मिक परंपरेनुसार, माघ गणेश जयंती हा गणपतीचा खरा जन्मदिवस आहे. जरी त्याच्या जन्माशी संबंधित अनेक कथा आणि पौराणिक कथा असल्या तरी त्यातील सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे देवी पार्वतीने भगवान गणेशाला जन्म दिला ती कथा. भगवान शिवाच्या अनुपस्थितीत, तिने तिच्या अंगावर चंदनाचा लेप लावून त्यापासून गणेशाची मूर्ती तयार केली आणि आंघोळीसाठी गेली असताना तिच्या संरक्षणासाठी तिने गणेशाला बाहेर पहारा देण्यासाठी प्रवेशद्वारावर उभे केले. जेव्हा भगवान शिव तिथे आले आणि त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे भगवान गणेशाशी भांडण झाले कारण त्याने आपल्या आईच्या आज्ञेनुसार शंकराला प्रवेश दिला नाही.

रागाच्या भरात शिवाने गणेशाचे मस्तक छाटले. जेव्हा पार्वतीने हे दृश्य पाहिले तेव्हा तिने देवी कालीचे रूप धारण केले आणि जगाचा नाश करण्याची धमकी दिली. याची सर्वांनाच चिंता वाटू लागली आणि त्यांनी भगवान शंकराकडे उपाय शोधून श्रीगणेशाला हत्तीचे मस्तक बसवले. भगवान शिवाने आपल्या शक्ती सामर्थ्याने पुन्हा त्याला जिवंत केले. यानंतर भगवान शिवाने पार्वतीला वचन दिले की पृथ्वीवरील इतर सर्व देवतांच्या आधी तिच्या मुलाची अर्थात गणेशाची पूजा केली जाईल.
जेव्हा भगवान श्रीकृष्णावर चोरीचा आरोप होता…
गणेश जयंती हा सण विशेषतः महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो. एका आख्यायिकेनुसार, एकदा भगवान श्रीकृष्णावर चोरीचा आरोप झाला कारण त्यांनी माघ शुक्ल चतुर्थीला चंद्र पाहिला, जो शुभ मानला जात नव्हता. भगवान श्रीकृष्णाने त्या दिवशी उपवास केला आणि चोरीच्या आरोपातून ते मुक्त झाले. तेव्हापासून माघ शुक्ल चतुर्थीला व्रत करण्याची परंपरा सुरू झाली. या दोन प्रमुख सणांशिवाय दर महिन्याला 2 गणेश चतुर्थी व्रत देखील पाळले जातात. एक शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला आणि दुसरे कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला.
गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी यात फरक काय ?
धार्मिक मान्यतेनुसार गणेश जयंतीला गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार या दिवशी गणेशाचा जन्म झाला होता. या दिवशी मध्यान्हात गणेशाची पूजा केली जाते. आणि पौराणिक कथेनुसार, भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येतात.
माघी गणेश जयंती कधी असते?
गणेश जयंतीच्या दिवशी उपवास करून बाप्पाची विधीनुसार पूजा केल्याने गणपतीच्या आशीर्वादाने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यभर सुख, शांती व संपत्ती टिकून राहते. यावर्षी ,1 फेब्रुवारी 2025 रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे.
हेही वाचा : Health Benefits Of Whey Water : फाटलेल्या दुधाचे आश्चर्यकारक फायदे
Edited By – Tanvi Gundaye