Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : पावसाळ्यात हेल्दी आरोग्याकरता वापरा हे मसाले

Health Tips : पावसाळ्यात हेल्दी आरोग्याकरता वापरा हे मसाले

Subscribe

नुकताच पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळा जेव्हा येतो तेव्हा तो स्वत: सोबत अनेक आजार घेऊन येतो. पावसाळ्यात अनेक आजार जसे की ताप, घशात खवखव, सर्दीखोकला आणि पोट खराब होणे यासारखे आजार होऊ शकतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना लवकर हे आजार होतात. वातावरण दमट असल्याकारणाने हवा, जेवण आणि पाण्यातदेखील बॅक्टेरिया पसरतात. ज्यामुळे समस्या अधिकच वाढू शकते. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे. यासाठीच आज जाणून घेऊयात काही अशा मसाल्यांबद्दल ज्यांचा तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात समावेश करायलाच हवा.

इम्युनिटी बूस्ट करणारी हळद :

स्वयंपाकघरात असणारी हळद ही एंटीऑक्सीडेंट, एंटी-इंफ्लेमेटरी आणि इम्युनिटी-बूस्टिंग गुणांनी समृद्ध आहे. हळदीत असणारे बायोएक्टिव्ह केमिकल करक्युमिन खूपच फायदेशीर असते. काही मेडिकल अभ्यासातून असे समोर आले आहे की हळद इम्युनिटी वाढवते आणि शरीराला आजारांपासून दूर ठेवते. आयुर्वेदानुसार हळदीचा वापर वात आणि पित्त दोषांना संतुलित करण्यासाठी केला जातो. पावसाळ्याच्या दिवसात आजारांना दूर ठेवण्यासाठी हळद मदत करते.

अपचन थांबवणारी बडिशेप :

सौंफ किंवा बडिशेप ही साधारण जेवल्यानंतर मुखवास म्हणून खाल्ली जाते. यामध्येही एक्टिव्ह केमिकल असतात. जे पचनासाठी मदत करतात. तर ते पोटातील गॅसपासूनही मुक्तता देण्यास मदत करतात व अपचन थांबवतात. बडिशेपचं सेवन जेवणानंतर किंवा जेवणात मिसळूनही केलं जाऊ शकतं.

मजबूत अँटिऑक्सिडेंटस असणारे जिरे :

जिऱ्यामध्ये फायटोकेमिकल कम्पोनंट असतात, जे मजबूत अँटिऑक्सिडेंटस असतात. पावसाळ्यात जिऱ्याचे सेवन केल्याने आजारांपासून बचाव होतो. यकृतातील पचन करणारे एंझाइम आणि पित्तरस वाढवून पचनशक्ती सुधारण्याचे काम जिरे करते.

पोटाच्या समस्येपासून आराम देणारा ओवा :

ओवा पचनासाठी प्रभावी असतो. ओव्यामध्ये आवश्यक ऑइल, बायोअॅक्टिव्ह केमिकल असतात. हे मळमळ आणि पोटाच्या समस्येपासून आराम देण्यासाठी मदत करते. कमकुवत पचनक्रिया असणाऱ्या लोकांनी ओव्याच पाणी प्यायला हवे. याने पचनक्रिया सुधारते.

घशातील खवखव दूर करणारे आले :

आलं पावसाळ्यात होणाऱ्या घशातील खवखव दूर करण्यासाठी उपयोगी आहे. खोकला आणि सर्दीपासून आराम देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याने रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. आले छातीतील कफ कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.

पचनक्रिया सुधारणारे हिंग :

हिंग पचनक्रिया सुधारते. आणि पोट फुलण्याच्या समस्येला दूर करतो. पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हिंग फायदेशीर आहे. हिंगामध्ये अँटिऑक्सिडेंटस, अँटिव्हायरल आणि अँटिफंगल गुण असतात. पावसाळ्यात हिंग खाल्ल्याने आजारांपासून बचाव होतो.

काळीमिरीमध्ये असतात अँटिबॅक्टेरियल गुण

काळीमिरीमध्ये कार्मिनेटिव्ह गुण असतात जे गॅस आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांपासून आराम देतात. हे इम्युनि सिस्टीम बूस्टदेखील करतात.

 

Manini