हिवाळ्यात आपल्याला काही ना काहीतरी गरम खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. तुम्ही पाहिलं असेल की थंडीच्या दिवसात लोक जास्त चहा पिऊ लागतात. अनेकांची सकाळ ही चहा किंवा कॉफी पिऊनच होते. तर काहीजण रात्री झोपण्यापूर्वीही चहा किंवा कॉफी पितात. भारतात चहा आणि कॉफी पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. परंतु भरपूर प्रमाणात चहा , कॉफी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. कारण कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन हे धोकादायकच ठरते.
हिवाळ्यात जेव्हा लोक चहा किंवा कॉफी पितात. तेव्हा त्यांच्या मनात हा प्रश्न येतो की कॉफी किंवा चहा यापैकी काय पिणे अधिक फायदेशीर ठरू शकते. आज आपण जाणून घेऊयात चहा किंवा कॉफीपैकी नेमकं काय पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे याबद्दल.
थंडीमध्ये चहा पिण्याचे फायदे :
हिवाळ्यात चहा प्यायल्याने आपल्या शरीराला आतून ऊर्जा मिळते. तु्म्ही थंडीच्या दिवसात आले, तुळस, काळीमिरी आणि लवंग असलेला चहादेखील पिऊ शकता. खरंतर चहामध्ये अँटिऑक्सिडंटस् सारखे अनेक तत्त्वं असतात. जे शरीराला फ्री रेडिकल्स पासून वाचवतात. आणि थंडीत आजारांपासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. हिवाळ्यात मसाला चहा किंवा आल्याचा चहा प्यायल्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला ,ताप , घशातील खवखव यांपासून आराम मिळतो. याशिवाय आयुर्वेदिक चहा आणि ग्रीन टी पचनासाठी खूप चांगला ठरतो. आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी मदत करते.
थंडीत कॉफी पिण्याचे फायदे :
कॉफीमध्ये असणारे कॅफीन तुम्हाला ताजेपणा आणि ऊर्जा देते. हिवाळ्यात येणारा आळस दूर करण्यासाठी कॉफी फायदेशीर ठरते. जर आपण थंडीत कॉफी पित असू तर शरीरतील पचनशक्ती सुधारते. ज्यामुळे थंडीत शरीरातील तापमान नियंत्रित करण्यासाठी मदत मिळू शकते. कॉफी ध्यान आणि एकाग्रता वाढवण्यासाठीही सहाय्य करते. याव्यतिरिक्त जर थंडीत आपण कॉफी पीत असू तर शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
दोघांपैकी काय आहे सर्वोत्तम ?
जर तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू इच्छित असाल आणि हिवाळ्यात होणाऱ्या सामान्य आजारांपासून स्वत:चा बचाव करू इच्छित असाल तर चहा हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. प्रयत्न करा की हिवाळ्यात तुम्ही हर्बल अर्थात आयुर्वेदिक चहा पिण्यालाच प्राधान्य द्याल. आणि जर तुम्हाला ऊर्जेची गरज असेल व काम करत असताना बराच वेळ जागं रहावं लागणार असेल तर कॉफी पिणं फायदेशीर ठरू शकतं.
हेही वाचा : Reduce Dust Allergy : धुळीच्या ॲलर्जीवर हे घरगुती उपाय करा
Edited By – Tanvi Gundaye