निरोगी आरोग्यासाठी आहार, शारीरिक हालचाली जितक्या महत्वाच्या आहेत, तितकीच झोपही गरजेची असते. यामुळे केवळ चांगली शारीरिक वाढच होत नाही तर मानसिक आरोग्यदेखील उत्तम राहते. झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते शिवाय हार्मोन्सचे नियमन होण्यास मदत होते. प्रत्येकजण वेगवेगळ्या तासांची झोप घेतो. कोणी जास्त झोपतो तर कोणी कमी. झोप प्रामुख्याने लाइफस्टाइल, वय आणि वैद्यकीय स्थितीवर स्थितीवर अवलंवून असते. मात्र, कोणत्या वयात किती तासांची झोप घ्यावी? हे बहुतांश जणांना ठाऊक नसते.
0 ते 3 महिन्यांचे नवजात बालक
डॉक्टरांच्या मते, नवजात बाळाला 14 ते 17 तासांची झोप आवश्यक असते. इतकी झोप त्यांच्या विकासासाठी आवश्यक असते. जर बाळ इतका वेळ झोपत असेल तर पालकांनी घाबरू नये. बाळाची वाढ हे योग्यरीत्या होत असल्याचे हे लक्षण आहे.
4 ते 11 महिन्यांचे बाळ –
या वयोगटातील मुलांनी दररोज 12 ते 15 तास झोपायला हवे. अशाने मुलांच्या शरीराचा विकास जलद आणि चांगला होतो. त्यामुळे तुमचे बाळ जर 12 ते 15 झोपत असेल तर पालकांनी काळजी करण्याची गरज नाही.
1 ते 2 वर्षांचे मूल –
या वयोगटातील मुले चालायला आणि खेळायला लागतात. अशावेळी मुलांना एनर्जीची गरज असते. त्यामुळे अशा मुलांनी किमान 11 ते 14 तास झोपायला हवे.
3 ते 5 वयोगटातील मुले –
प्रि-स्कुल वयातील अर्थात 3 ते 5 वयोगटातली मुले शिकण्याच्या टप्प्यात असतात. तज्ज्ञांच्या मते, अशा मुलांनी 10 ते 13 तास झोपावे.
6 ते 12 वयोगटातील मुले –
या वयोगटातील मुलांचा शारीरिक विकास होत असतो. या काळात त्यांची उंचीही वाढत असते. डॉक्टर अशा मुलांना कमीतकमी 9 ते 12 तास झोपण्याचा सल्ला देतात.
13 ते 18 वर्ष –
या वयोगटातली मुले बराचसा वेळ नवीन गोष्टी शिकण्यात आणि समजून घेण्यात घालवतात. या काळात अभ्यासाचा ताणही असतो. याशिवाय या काळात प्रजनन अवयवांचा विकासही होत असतो. अशा स्थितीत योग्य विकासासाठी 8 ते 10 तासांची झोप घेणे आवश्यक असते.
18 ते 60 वर्ष –
या वयोगटातील व्यक्तीचा बराचसा वेळ काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये जातो. अशा वेळी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. तज्ञाच्या मते, 7 ते 9 तासांची झोप घेणे आवश्यक असते.
61 वयापेक्षा अधिक असणारे –
जसजसे वय वाढत जाते तसेतसे काम करण्याची क्षमता कमी होत जाते. अशा लोकांना एनर्जीची आवश्यकता अधिक असते. यासह अनेक वयोवृद्ध लोकांना या वयात अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थिती वयोवृद्धांनी 7 ते 8 तासांची झोप घ्यायला हवी.
हेही वाचा : चालण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या