दही, ताक, तूप हे सर्व शरीरासाठी उत्तम पेय आहेत. आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही पेय नियमीत आहारात असावीत असा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. कारण प्राचीन काळापासून जेवणासोबत दही अथवा ताक वाढण्याची पद्धत आहे. विशेषतः जड जेवणासोबत फोडणीचे अथवा मसाला ताक पिणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदात ताकाला अमृतपेय असं म्हटलं आहे. कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे कार्य करतं.
फेब्रुवारी संपण्याआधीच गुलाबी थंडीने पळ काढला असल्याने आता उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. सकाळी थंड, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी घामाघूम अशी अवस्था झाल्याने तब्येतीवर त्याचे परिणाम दिसू लागतात. त्यावर आळा घालण्यासाठी ताकाचे नियमित सेवन सुरू करता येईल. ताक हे शरीरात थंडावा निर्माण करण्याचे काम करते. ताक हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि ते शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यातील आहारात ताकाचा आवर्जून समावेश केला जातो. ताक पिण्याचे अनेक फायदे आरोग्यावर होतात. यासाठी आरोग्यतज्ञ नेहमी एक ग्लास ताक पिण्याचा सल्ला देतात. यासाठीच जाणून घेऊ या ताक पिण्यामुळे आरोग्यावर काय चांगला परिणाम होतो.
शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो
उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग म्हणजे ताक पिणे होय. एक ग्लास ताकात जिरे पावडर, पुदिना, कोथिंबीर आणि मीठ मिसळून प्यायल्यामुळे तुमची तहान लगेच भागते. शिवाय बाहेरील उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत होते. तुम्ही ताकात एखादा बर्फाचा तुकडा टाकू शकता. मात्र बर्फ न टाकताही ताक पिण्यामुळे तुमच्या शरीराला त्वरीत थंडावा मिळू शकतो. बाजारातील कोल्ड ड्रिंकपेक्षा हे नैसर्गिक पेय नियमित पिणे शरीरासाठी नक्कीच लाभदाययक ठरू शकते. ज्या महिलांना मॅनोपॉजच्या काळात अंगातून दाह जाणवतो. त्यांनी नियमित ताप पिल्यास त्यांना नक्कीच आराम मिळू शकतो.
डिहाड्रेशनपासून बचाव होतो
दह्यामध्ये भरपूर पाणी टाकून ते बराच वेळ घुसळण्यामुळे ताक निर्माण होते. त्यामुळे दह्यापेक्षा ताकामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. ताकामध्ये नव्वद टक्के पाणी आणि पोटॅशिअमसारखे इलेक्ट्रोलेट असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पाण्याची गरज असते. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. मात्र जर तुम्ही नियमित ताप पित असाल तर तुमचे शरीर सतत हायड्रेट राहते आणि डिहाड्रेशन होत नाही.
अॅसिडिटी कमी होते
बऱ्याचदा बाहेरचे अपथ्यकारक पदार्थ खाण्यामुळे अथवा अती प्रमाणात तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात. मात्र यावर सोपा उपाय हा की एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर आणि धणे पावडर मिसळून पिणे. कारण ताकातील लॅक्टिक अॅसिड तुमच्या पोटातील अॅसिडिटी कमी करते आणि धणे पावडर आणि ताकाचा थंडावा छातीत होणारी जळजळ कमी करते.
त्वचेसाठी उत्तम
ताक नियमित पिण्याची सवय फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यासाठीही चांगली आहे. कारण ताक पिण्यामिुळे तुमची पचनशक्ती सुधारते. ज्याचा परिणाम असा होतो की तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन्स यामुळे बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे ताकामधील लॅक्टिक अॅसिड तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा नितळ होते. ताक पिण्यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंगचे डाग, काळे डाग, पिंपल्सचे व्रण आणि काळसरपणा कमी होतो. ताक तुमच्या त्वचेला आतून मॉस्चराईझ करते, त्वचा चमकदार करते आणि तुम्हाला चिरतरूण ठेवते. ताकामुळे तुम्हाला डागविरहित त्वचा मिळू शकते जाणून घ्या कशी.
बीपी नियंत्रित राहिल
जेवणानंतर ताक प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच ताकामध्ये बायोएक्टिव्ह प्रोटीन असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
आपण रोज ताक पिऊ शकतो का?
हो, तुम्ही ताक रोज पिऊ शकता. ह्यामध्ये भरपूर सारे चांगले प्रोटीन, मिनरल्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. तसेच ताक पिल्याने शरीरात पाण्याची पण कमतरता होत नाही.