लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. विशेष करून मुलींच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा असतो. लहानपणापासून लाडात वाढलेली लेक लग्न करून सासरी जाते. लग्नात मुलीचे आई- वडील मुलीचे कन्यादान करून तिला सासरी पाठवतात. कन्यादानाचा हा क्षण प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांसाठी भावूक असतो. खरं तर, भारतीय लग्नसोहळ्यातील प्रत्येक विधीला अर्थ आहे. यांपैकी एक म्हणजे कन्यादान. पण, या कन्यादानाचे महत्त्व काय, ही प्रथा का केली जाते, हे समजून घेऊयात.
कन्यादानाचे महत्त्व –
कन्यादान या शब्दातच या विधीचा अर्थ लपलेला आहे. या विधीत कन्येचा हात नवरदेवाकडे सोपवला जातो, ज्याला आपण कन्यादान असे म्हणतो. कन्यादानाशिवाय लग्नाचा विधी हा अपूर्ण मानला जातो.
हिंदू धर्मात कन्यादानापेक्षा मोठे कोणतेही दान समजले जात नाही. शास्त्रात असे सांगण्यात आले आहे की, कन्यादानाने मुलीच्या आई-वडिलांना आणि कुटूंबियाना पुण्य प्राप्त होते. या विधीनंतर मुलगी सासरी राहायला जाते.
कन्यादानाची सुरूवात कशी झाली –
पौराणिक कथेनुसार प्रजापती दक्षने त्याच्या मुलींचे लग्न केल्यानंतर प्रथम कन्यादान केले. प्रजापती दक्ष राजाला 27 कन्या होत्या. यांचा विवाह चंद्राशी झाला होता. त्यामुळे या 27 कन्यांना नक्षत्र म्हटलं गेलं आहे. जग सुरळीत चालावे म्हणून प्रजापती दक्षने सर्वप्रथम चंद्राला आपल्या सर्व मुली सोपवल्या होत्या.
कन्यादानाचा विधी कसा पार पडतो –
- सर्वात आधी मुलीची आई मुलीला हळद लावून तिचे हात पिवळे करते.
- मुलीला हळद-कुंकू लावून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करते.
- यानंतर आई – वडील आपल्या मुलीचा हात हातात घेतात आणि वराच्या हातात देतात.
- यानंतर वर वधुचा हात हातात घेऊन तिची जबाबदारी घेण्याचा संकल्प घेतो.
- अशाप्रकारे आपल्या कन्यादानाची विधी पार पडते.
भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला कन्यादानाचा अर्थ –
भगवान श्रीकृष्णाने अर्जुन आणि सुभद्रा यांचा गंधर्व विवाह लावला होता, तेव्हा कृष्णाचा मोठा भाऊ बलराम याचा याविवाहाला विरोध होता. या विवाहावर बलराम म्हणाले होते की, सुभद्राचे कन्यादान झाले नाही. जोपर्यत सुभद्राचे कन्यादान होत नाही तोपर्यत हा विवाह अपूर्ण मानला जाणार. यावर श्रीकृष्ण असे म्हणाले होते की, मुलीचे दान करायला ती कोणताही प्राणी, वस्तू नाही. कन्यादानाचा खरा अर्थ म्हणजे मुलीचे आदान असा होतो. लग्नाच्या वेळी वधुचे वडील नवरदेवाच्या हातात मुलीचा हात देतात आणि सांगतात की, आजपर्यत मी माझ्या मुलीचे पालनपोषण केले आहे, आजपासून मी माझी मुलगी तुझ्या स्वाधीन करतो. यानंतर तिची जबाबदारीची घेत वधुच्या वडीलांना नवरदेव वचन देतो. या विधीला मुलीचे आदान प्रदान असे म्हटले जाते. मुलगी ही देवाने दिलेली देणगी आहे आणि देवाने दिलेल्या देणगीची दान होत नाही.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde