सगळ्यांना नेहमी वाटते आपले बाळ निरोगी आणि गुटगुटीत असावे. यासाठी प्रत्येक आई तिच्या बाळासाठी अनेक प्रयन्त करत असते. अशातच बरेचदा डॉक्टरांच्या सल्ल्याने बाजारातील सेरेलॅकही सुरू करण्यात येते. पण यापेक्षा घरीच बाळाला आईने पौष्टिक सेरेलॅक बनवून देणे अधिक फायदेशीर ठरते. साधारण 6 महिन्यानंतर बाळाला योग्य असा आहार सुरू करण्यात येतो.
सेरेलॅक म्हणजे बाळाच्या आरोग्याला देण्यात येणारा पौष्टिक आहार. धान्य, तृणधान्य आणि कडधान्य, नट्स या सर्वांचे मिश्रण करून बाळासाठी एक लापशी तयार करण्यात येते ज्याला सेरेलॅक असे म्हटले जाते. शरीराला आवश्यक पोषण असणारे सर्व पदार्थ यामध्ये समाविष्ट करण्यात येतात आणि बाळाचे आरोग्य यामुळे चांगले राहून प्रतिकारशक्ती वाढते. सेरेलॅक वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या पदार्थांनी बनविण्यात येते. यामध्ये गहू, दलिया, बदाम, काजू, तांदूळ, साबुदाणा, मसूर डाळ या पदार्थांचा समावेश करण्यात येतो.
सेरेलॅक बनविण्यासाठी साहित्य
- इंद्रायणी तांदूळ
- मूग डाळ
- उडदाची डाळ
- बदाम
- जिरे
- ओवा
- साजूक तूप
असे बनवा बाळांसाठी घरच्या घरी सेरेलॅक
- वर दिलेले सर्व साहित्य एका भांड्यात व्यवस्थित 2-3 वेळा धुवा आणि त्यात कोणताही खडा राहणार नाही हे पाहा.
- त्यानंतर चाळणीमध्ये हे पाणी निथळण्यासाठी 15-20 मिनिट्स ठेवा.
- पाणी निथळल्यावर सुती कपड्यावर पसरवून सुकविण्यासाठी ठेवा.
- अर्धा – 1 तास झाल्यावर हे सर्व तुम्ही एका कढईत मंद आचेवर भाजून घ्या.
- मूगडाळ, तूरडाळ, उडीद सर्व डाळी पण तुम्ही मिक्स करू शकता.
- थोडं थंड झाल्यावर मिक्सरमधून याची पावडर करून घ्या.
- पिठाच्या चाळणीने ही पावडर व्यवस्थित चाळून घ्या. जाडसर ठेऊ नका.
- हवाबंद डब्यात 2-3 महिने ठेवल्यास सहज टिकते.