महाशिवरात्री हा महादेवाच्या भक्तांसाठी अत्यंत खास दिवस असतो. हिंदू ग्रंथ, पुराणांमध्ये या दिवसाचे विशेष महत्व सांगितले आहे. पवित्र दिवसांपैकी एक असा हा दिवस शिव- शक्ती मिलनाचे प्रतीक मानला जातो. धार्मिक मान्यतांनुसार, याच दिवशी महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त विविध भागात खास पूजा तसेच होम हवन केले जातात. आत्मशुद्धी, मोक्ष आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महाशिवरात्रीचा मुहूर्त सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते. पण अनेकांना शिवलिंगाचे पूजन करतेवेळी महादेवाला कोणते फुल अर्पण करावे? कोणता मंत्र जपावा? याविषयी माहिती नसते. तर आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Mahashivratri 2025 Learn Rituals, Mantras and Muhurt)
तिथी आणि शुभ मुहूर्त
यंदा 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल. पंचांगानुसार, चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी संपेल. या शुभकाळात महाशिवरात्रीचे पूजन आणि जागरण करणे लाभदायी ठरेल.
पूजा विधी आणि साहित्य
महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर शिवलिंगाचा दूध, दही, मध, गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक केला जातो. यानंतर बेलपत्र, काटेधोत्रा आणि सफेद फुल अर्पण केले जाते. तसेच शिवलिंगावर भस्म, चंदन आणि केशर लावणे शुभ मानले जाते. याशिवाय धूप, दिवा, कापूर आणि गाईच्या तुपाचा वापर करून महादेवाची आरती केली जाते. यावेळी देवाला प्रसादात ठंडाई, लस्सी, मिठाई, फळे आणि हलवा दाखवण्याची फार जुनी परंपरा आहे.
महाशिवरात्रीच्या व्रताचे महत्व
महादेवाचे बरेच भक्त या दिवशी व्रत करतात. त्याचे एक खास महत्व आहे. ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार, महाशिवरात्रीचे व्रत केल्यास आयुष्यात सुख, समृद्धी, शांती आणि समाधान प्राप्त होते. जे लोक हे व्रत मनापासून पूर्ण करतात त्यांना महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते. असेही म्हणतात की, या दिवशी व्रत करून दिवसभर भगवान शंकराची आराधना केल्याने आणि रात्रभर जागून देवाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. तसेच वैवाहिक जीवनदेखील सुखी होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.
कोणत्या मंत्रांचा जाप कराल?
शिवपुराणांत सांगितल्याप्रमाणे, महादेवाचा ‘ओम नमः शिवाय’ हा मंत्र सर्वात शक्तीशाली आहे. त्यामुळे महाशिवरात्रीचे पूजन करताना या मंत्राचा जाप करणे आवश्यक मानले जाते. याशिवाय शिव तांडव स्तोत्र, शिव पंचाक्षरी स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र, शिव शतक आणि रुद्राष्टक पाठ केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. यामुळे मनःशांती मिळते आणि सर्व संकटं दूर होतात.
हेही पहा –
Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीचा उपवास करताना घ्या ही काळजी