Saturday, March 15, 2025
HomeमानिनीReligiousDnyaneshwar Wani : वाणी ज्ञानेश्वरांची

Dnyaneshwar Wani : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसें ज्ञानजातां करी। आघवेंचि एकीकडे सारी।
मग मन बुद्धि मोहरी। अध्यात्मज्ञानीं॥
त्याप्रमाणे जेवढी ज्ञाने आहेत त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारतो. नंतर मन व बुद्धीस अध्यात्म ज्ञानाच्या मार्गाला लावतो.
म्हणे एक हेंचि आथी। येर जाणणें ते भ्रांती।
ऐसी निकुरेंसी मती। मेरु होय॥
तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांती होय, अशा निश्चयाला त्याची बुद्धी मेरू होते.
एवं निश्चयो जयाचा। द्वारीं आध्यात्मज्ञानाचा।
ध्रुव देवो गगनींचा। तैसा राहिला॥
याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्म ज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुव तार्‍याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो.
तयाच्या ठायीं ज्ञान। या बोला नाहीं आन।
जे ज्ञानीं बैसलें मन। तेव्हांचि तें तो मी॥
त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे या माझ्या बोलण्यात आडपडदा आहे असे अर्जुना तू म्हणशील. जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला.
तरी बैसलेपणें जें होये। बैसतांचि बोलें न होये।
तरी ज्ञाना तया आहे। सरिसा पाडु॥
तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती ज्ञानाचे ठिकाणी स्थिरता होत असण्यावेळीच होते असे नाही, तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे.
आणि तत्त्वज्ञान निर्मळ। फळे जें एक फळ।
तें ज्ञेयही वरी सरळ। दिठी जया॥
आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फळ उत्पन्न करते, ते फळ म्हणजे ज्ञेय होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते.
एर्‍हवीं बोधा आलेनि ज्ञानें। जरी ज्ञेय न दिसेचि मनें।
तरी ज्ञानलाभुही न मने। जाहला सांता॥
ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरीदेखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही.
आंधळेनि हातीं दिवा। घेऊनि काय करावा?।
तैसा ज्ञाननिश्चयो आघवा। वायांचि जाय॥
आंधळ्याने दिव्याचा काय उपयोग करावा? आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही, तर ते ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो, त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच जातो.

Manini