तैसें ज्ञान जेथ नाहीं । तेंचि अज्ञान पाहीं ।
तरी सांगों कांहीं कांहीं । चिन्हें तियें ॥
त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज. तरी पण ती काही लक्षणे सांगतो ऐक.
तरी संभावने जिये । जो मानाची वाट पाहे ।
सत्कारें होये । तोषु जया ॥
तरी जो प्रतिष्ठेकरता जगतो, जो मानाची वाट पहातो आणि ज्याला सत्काराने संतोष होतो.
गर्वें पर्वताचीं शिखरें । तैसा महत्त्वावरूनि नुतरे ।
तयाचिया ठायीं पुरे । अज्ञान आहे ॥
पर्वताची शिखरे जशी खाली लवत नाहीत, तसा जो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज.
आणि स्वधर्माची मांगळी । बांधे वाचेच्या पिंपळीं ।
उभिला जैसा देउळीं । जाणोनि कुंचा ॥
आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळाला जशी मुंज (मोळाची दोरी) सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात, त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो, (म्हणजे आपण केलेला धर्म वाचेने लोकांना सांगतो) अथवा जसे देवळात सर्वांना उघड दिसेल असे मोर्चेल जाणूनबुजून ठेवलेले असते.
घाली विद्येचा पसारा । सूये सुकृताचा डांगोरा ।
करी तेतुलें मोहरा । स्फीतीचिया ॥
विद्येचा पसारा (दुकान) घालतो, केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटावतो आणि जेवढे म्हणून काही करतो, तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो.
आंग वरिवरी चर्ची । जनातें अभ्यर्चितां वंची ।
तो जाण पां अज्ञानाची । खाणी एथ ॥
स्वत:च्या अंगाला भस्म, गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तर्हेने फासतो व लोक याची पूज्य म्हणून पूजा करत असता हा त्यास फसवीत रहातो, तो अज्ञानाची खाण आहे असे समज.
आणि वन्ही वनीं विचरे । तेथ जळती जैसीं जंगमें स्थावरें ।
तैसें जयाचेनि आचारें । जगा दुःख ॥
आणि ज्याप्रमाणे रानास वणवा लागला म्हणजे वृक्ष, प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे ज्याच्या वागणुकीने सर्व जगास दु:ख होते.