कौतुकें जें जें जल्पे। तें साबळाहूनि तीख रुपे।
विषाहूनि संकल्पें। मारकु जो॥
आणि जो सहज जे बोलेल, ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचते व जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो.
तयातें बहु अज्ञान। तोचि अज्ञानाचें निधान।
हिंसेसि आयतन। जयाचें जिणें॥
आणि ज्याचे वागणे हिंसेचे घरच असते, त्याच्याजवळ फार अज्ञान आहे तर तोच अज्ञानाचा खजिना आहे.
आणि फुंकें भाता फुगे। रेचिलिया सवेंचि उफगे।
तैसा संयोगवियोगें। चढे वोहटे॥
जसा भाता फुंकल्याने फुगतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो, त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हर्षित व दु:खी होतो.
पडली वारयाचिया वळसा। धुळी चढे आकाशा।
हरिखा वळघे तैसा। स्तुतीवेळे॥
वार्याच्या भोवर्यात धूळ सापडली असता ती जशी आकाशाकडे चढते तसा स्तुतीवेळी आनंदाने चढून जातो.
निंदा मोटकी आइके। आणि कपाळ धरूनि ठाके।
थेंबें विरे वारोनि शोखे। चिखलु जैसा॥
जराशी निंदा ऐकली की कपाळ धरून राहतो व जसा चिखल पाण्याच्या एका थेंबाने विरघळतो व थोड्याशा वार्याने तो वाळतो.
तैसा मानापमानीं होये। जो कोण्हीचि उर्मी न साहे।
तयाच्या ठायीं आहे। अज्ञान पुरें॥
त्याप्रमाणे मानाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणात्याही प्रकारचा वेग सहन होत नाही, त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे.
आणि जयाचिया मनीं गांठी। वरिवरी मोकळी वाचा दिठी।
आंगें मिळे जीवें पाठीं। भलतया दे॥
आणि ज्याच्या मनात गाठ असते, ज्याचे बोलणे, पाहणे वरून मोकळ्या मनाचे असते व तो वाटेल त्याच्याशी शरीराने मिळतो, पण मनाने मात्र त्यास तोंडघशी पाडतो.
व्याधाचे चारा घालणें। तैसें प्रांजळ जोगावणें।
चांगाचीं अंतःकरणें। विरु करी॥
पारध्याचे जनावरास चारा घालणे जसे असते त्याप्रमाणे सरळ ज्याचे दुसर्यास पोसणे अथवा सांभाळणे असते, जो चांगल्या माणसाची अंत:करणे विरुद्ध करतो.
गार शेवाळें गुंडाळली। कां निंबोळी जैसी पिकली।
तैसी जयाची भली। बाह्य क्रिया॥
शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते अथवा पिकलेली लिंबोणी जशी वरून सुंदर दिसते, तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगले असते.