अज्ञान तयाचिया ठायीं। ठेविलें असे पाहीं।
याबोला आन नाहीं। सत्य मानीं॥
त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे समज, यात अन्यथा नाही हे खरे मान.
आणि गुरुकुळीं लाजे। जो गुरुभक्ती उभजे।
विद्या घेऊनि माजे। गुरूसींचि जो॥
आणि गुरुकुळी ज्याला लाज वाटते, जो गुरुभक्तीला कंटाळतो व गुरूपासून विद्या शिकून गुरूवरच उलटतो.
आता गुरुभक्तांचें नांव घेवों। तेणें वाचेसि प्रायश्चित देवों।
गुरुसेवका नांव पावों। सूर्यु जैसा॥
म्हणून आता गुरूच्या भक्ताचे नामस्मरण करू व त्या योगाने वाचेस प्रायश्चित्त देऊ. गुरुभक्ताचे नाव म्हणजे जणूकाय सूर्यच आहे असे समज.
येतुलेनि पांगु पापाचा। निस्तरेल हे वाचा।
जो गुरुतल्पगाचा। नामीं आला॥
एवढ्याने गुरुभक्ताचे नाव घेतल्याने ती वाचा गुरुविषयी मात्रागमनी असणाराचे नाव घेण्याच्या पापामुळे जो हीनपणा झाला तो घालवील.
हा ठायवरी। तया नामाचें भय हरी।
मग म्हणे अवधारीं। आणिकें चिन्हें॥
गुरुभक्ताच्या नावाचा उच्चार येथपर्यंत अभक्ताच्या नामोच्चरणाचे भय हरण करतो, मग आणखी चिन्हे ऐक, असे देव म्हणाले.
तरि आंगें कर्में ढिला। जो मनें विकल्पें भरला।
अडवींचा अवगळला। कुहा जैसा॥
तरी तो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो, ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते, तो म्हणजे रानातील त्याज्य म्हणून टाकलेला आडच होय.
तया तोंडीं कांटिवडे। आंतु नुसधीं हाडें।
अशुचि तेणें पाडें। सबाह्य जो॥
त्या रानातील आडाच्या तोंडावर काटे वगैरे घाण पडलेली असते आणि आत फक्त हाडे असतात.
जैसें पोटालागीं सुणें। उघडें झांकलें न म्हणे।
तैसें आपलें परावें नेणे। द्रव्यालागीं॥
ज्याप्रमाणे कुत्रे पोटाला अन्न मिळण्याकरिता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करीत नाही, त्याप्रमाणे द्रव्याकरिता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही.
इया ग्रामसिंहाचिया ठायीं। जैसा मिळणी ठावो अठावो नाहीं।
तैसा स्त्रीविषयीं कांहीं। विचारीना॥
या कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कुत्रीच्या संगाला योग्य किंवा अयोग्य जागा याचा विचार नसतो, त्याप्रमाणे स्त्रीसंगाविषयी जो काही विचार करीत नाही.