आणि तीर्थें धौतें तटें । तपोवनें चोखटें ।
आवडती कपाटें । वसवूं जया ॥
आणि तीर्थे (नदी व समुद्र यांचे) पवित्र किनारे, तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा या ठिकाणी ज्यास रहावयास आवडते.
शैलकक्षांचीं कुहरें । जळाशय परिसरें ।
अधिष्ठी जो आदरें । नगरा न ये ॥
डोंगराच्या बगलेतील गुहामधे व सरोवराच्या आसपास जो प्रेमाने रहातो आणि शहरात येत नाही.
बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदाची खंती ।
जाण मनुष्याकारें मूर्ती । ज्ञानाची तो ॥
ज्याची एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकांचा कंटाळा असतो, तो मनुष्यरूपाने ज्ञानाची केवल मूर्तीच आहे असे समज.
आणिकहि पुढती । चिन्हें गा सुमती ।
ज्ञानाचिये निरुती । लागीं सांगों ॥
हे बुद्धिमान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय करण्याकरता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगतो.
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।
एतद्ज्ञा नमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा ॥
अध्यात्मज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म तेथे दृष्टी स्थित होणे, या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. या खेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय.
तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे ।
तें जया दिसें । ज्ञानास्तव ॥
तर परमात्मा म्हणून जी एक वस्तु आहे, ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते.
तें एकवांचूनि आनें । जियें भवस्वर्गादि ज्ञानें ।
तें अज्ञान ऐसा मनें । निश्चयो केला ॥
त्या अध्यात्मज्ञानावाचून, इतर जी स्वर्ग व संसारसंबंधाची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो.
स्वर्गा जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी ।
दे अध्यात्मज्ञानीं बुडी । सद्भावाची ॥
स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारासंबंधाने कानावर गोष्टी येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेऊन त्यात रममाण होतो.
भंगलिये वाटे । शोधूनिया अव्हांटे ।
निघिजे जेवीं नीटें । राजपंथें ॥
(जसे एखाद्या प्रवाशाने जेथे) वाट फुटते, तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत, त्यांचा शोध करून मग जसे सरळ मार्गाने निघावे.