Thursday, March 27, 2025
HomeमानिनीReligiousDnyaneshwari Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Dnyaneshwari Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जैसें बाभुळीचें खोड। गिरबडूनि जाती सरड।
तैसें पिचडीं तोंड। सरकटिजैल॥
ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरड गिरबिडून टाकतात त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिडून जाईल.
रांधवणी चुलीपुढें। पर्हे उन्मादती खातवडे।
तैसींचि यें नाकाडें। बिडबिडती॥
स्वयंपाक करण्याच्या चुलीपुढे खाचेत अगर चरात जसे दुर्गंधीयुक्त बुडबुडे उसळतात, त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे येतील.
तांबुलें वोंठ राऊं। हांसतां दांत दाऊं।
सनागर मिरऊं। बोल जेणें॥
ज्या मुखाचे ओठ मी विड्याने तारुण्यावस्थेत रंगवतो व ज्यातील दात हसताना दाखवतो, ज्या मुखाने चांगले सुंदर बोलतो.
तयाचि पाहे या तोंडा। येईल जळंबटाचा लोंढा।
इया उमळती दाढा। दातांसहित॥
त्याच तोंडाला उद्या म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दातासकट उखडून जातील.
कुळवाडी रिणें दाटली। कां वांकडिया ढोरें बैसलीं।
तैसी नुठी कांहीं केली। जीभचि हे॥
शेतकीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता ऊर्जित दशेला येत नाही, अथवा वाकडीच्या पावसाने एकदा गुरे बसली म्हणजे उठत नाहीत, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीभ उठणार नाही.
कुसळें कोरडीं। वारेनि जाती बरडीं।
तैसा आपदा तोंडीं। दाढियेसी॥
माळजमिनीतील वाळलेली कुसळे जशी वार्‍याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होते.
आषाढींचेनि जळें। जैसीं झिरपती शैलाचीं मौळें।
तैसें खांडीहूनि लाळे। पडती पूर॥
आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वाहतील.
वाचेसि अपवाडु। कानीं अनुघडु।
पिंड गरुवा माकडु। होईल हा॥
वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य राहणार नाही, कानाची कवाडे बंद होतील व हे पुष्ट शरीर म्हातार्‍या माकडासारखे बेडौल होईल.
तृणाचें बुझवणें। आंदोळे वारेनगुणें।
तैसें येईल कांपणें। सर्वांगासी॥
गवताचे बुजगावणे जसे वार्‍याने हलते त्याप्रमाणे म्हातारपणी सर्वांगात कापरे भरेल.
पायां पडती वेंगडी। हात वळती मुरकुंडी।
बरवपणा बागडी। नाचविजैल॥
पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी सोंगासारखा नाचवला जाईल.
मळमूत्रद्वारें। होऊनि ठाती खोंकरें।
नवसियें होती इतरें। माझियां निधनीं॥
मलमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील.

Manini