आणि मीवांचूनि कांहीं। आणिक गोमटें नाहीं।
ऐसा निश्चयोचि तिहीं। जयाचा केला॥
आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी (कायेने, वाचेने व मनाने) निश्चयच केलेला आहे.
शरीर वाचा मानस। पियालीं कृतनिश्चयाचा कोश।
एक मीवांचूनि वास। न पाहती आन॥
ज्याचे शरीर वाचा, वाचा व मन या तिघांनी वरीलप्रमाणे केलेल्या निश्चयाचा कोश प्यायला आहे आणि एक माझ्यावाचून आणखी कशाचीही इच्छा ते करीत नाहीत.
किंबहुना निकट निज। जयाचें जाहलें मज।
तेणें आपणयां आम्हां सेज। एकी केली॥
फार काय सांगावे! ज्याचे अंत:करण माझ्याशी अगदी जडून राहिले आहे, त्याने आपले व आमचे एक अंथरुण केले आहे. माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन राहिला आहे.
रिगतां वल्लभापुढें । नाहीं आंगीं जीवीं सांकडें ।
तिये कांतेचेनि पाडें । एकसरला जो ॥
पतीकडे जाताना पतिव्रता स्त्रीला शरीराने व अंत:करणाने जसा संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरला आहे.
मिळोनि मिळतचि असे । समुद्रीं गंगाजळ जैसें ।
मी होऊनि मज तैसें । सर्वस्वें भजती ॥
गंगेचे उदक समुद्रास मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीत असतात.
सूर्याच्या होण्यां होईजे । कां सूर्यासवेंचि जाइजे ।
हें विकलेपण साजे । प्रभेसि जेवीं ॥
सूर्याच्या उदयाबरोबर प्रगट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा (अनन्यता) प्रभेला जसा शोभतो.
पैं पाणियाचिये भूमिके । पाणी तळपे कौतुकें ।
ते लहरी म्हणती लौकिकें । एर्हवीं तें पाणी ॥
पाण्याच्या सपाटीवर मौजेने हालत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे.
जो अनन्यु यापरी । मी जाहलाहि मातें वरी ।
तोचि तो मूर्तधारी । ज्ञान पैं गा ॥
जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो, म्हणजे माझ्याशी ऐक्य पावूनही माझे भजन करतो, अर्जुना तोच तो मूर्तिमंत ज्ञानी होय.