तैसेंचि नाना रोग। पडिघाती ना जंव पुढां आंग।
तंव आरोग्याचे उपेग। करूनि घाली॥
त्याचप्रमाणे नाना रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो.
सापाच्या तोंडी। पडली जे उंडी।
ते लाऊनि सांडी। प्रबुद्धु जैसा॥
सापाच्या तोंडात पडलेला एखादा पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो.
तैसा वियोगें जेणें दुःखे। विपत्ति शोक पोखे।
तें स्नेह सांडूनि सुखें। उदासु होय॥
त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दु:खे, विपत्ती व शोक ही पोसली जातात, तो स्नेह टाकून जो समाधान वृत्ती ठेवून उदास होऊन राहतो.
आणि जेणें जेणें कडे। दोष सूतील तोंडें।
तयां कर्मरंध्री गुंडे। नियमाचे दाटी॥
आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचुप्रवेश करतील त्या त्या कर्म करणार्या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो.
ऐसऐसिया आइती। जयाची परी असती।
तोचि ज्ञानसंपत्ती। गोसावी गा॥
अशा सामुग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो, तोच अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे समज.
आतां आणीकही एक। लक्षण अलौकिक।
सांगेन आइक। धनंजया॥
आता आणखीही एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो, अर्जुना, ऐक.
असक्तिरनभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु।
नित्यंच समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु॥
देहासंबंधी अनासक्ती, स्त्रीपुत्रगृह इत्यादिकांविषयी अलोलूपता व इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व ढळू न देणे.
तरि जो या देहावरी। उदासु ऐसिया परी।
उखिता जैसा बिढारीं। बैसला आहे॥
तर बिर्हाडी बसवलेला वाटसरू जसा त्या बिर्हाडाविषयी उदास असतो, तशा प्रकाराने जो स्वत:च्या शरीराविषयी उदास असतो.
कां झाडाची सावली। वाटे जातां मीनली।
घरावरी तेतुली। आस्था नाहीं॥
अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे आस्था नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वत:च्या घरावर किंचितही ममत्व नसते.
सावली सरिसीच असे। परी असे हें नेणिजे जैसें।
स्त्रियेचें तैसें। लोलुप्य नाहीं॥
आपली सावली आपल्याबरोबरच नेहमी असते, परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते. त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते.