Wednesday, March 19, 2025
HomeमानिनीReligiousDnyaneshwari - वाणी ज्ञानेश्वरांची

Dnyaneshwari – वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

कर्माचा वेळु चुके। कां नित्य नैमित्तिक ठाके।
तें जया न दुखे। जीवामाजीं॥
विहित कर्मे करण्याची वेळ चुकली अथवा नित्य नैमित्तिक कर्मे राहिली तर त्याचे ज्याला मनात दु:ख वाटत नाही.
पापी जो निसुगु। पुण्याविषयीं अतिनिलागु।
जयाचिया मनीं वेगु। विकल्पाचा॥
पाप करण्यास ज्याला लाज वाटत नाही, पुण्याविषयी जो अतिशय नि:संग बनलेला असतो, ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असते.
तो जाण निखिळा। अज्ञानाचा पुतळा।
जो बांधोनि असे डोळां। वित्ताशेतें॥
जो आपल्या डोळ्यांपुढे धनाच्या इच्छेस कायम करून चालतो, तो एकरस अज्ञानाचा पुतळा असे समज.
आणि स्वार्थें अळुमाळें। जो धैर्यापासोनि चळे।
जैसें तृणबीज ढळे। मुंगियेचेनी॥
आणि ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडते, त्याप्रमाणे थोड्याशा स्वार्थाकरिता जो निश्चयापासून ढळतो.
पावो सूदलिया सवें। जैसें थिल्लर कालवे।
तैसा भयाचेनि नांवें। गजबजे जो॥
डबक्यात पाय घातल्याबरोबर जसे डबक्यातील पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे भयाचे नाव ऐकल्याबरोबर जो घाबरून जातो.
मनोरथांचिया धारसा। वाहणें जयाचिया मानसा।
पूरीं पडिला जैसा। दुधिया पाहीं॥
वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो, त्याप्रमाणे दु:खाची बातमी ऐकल्याबरोबर ज्याचे मन दु:खाने पुरे व्यापले जाते.
वायूचेनि सावायें। धू दिगंतरा जाये।
दुःखवार्ता होये। तसें जया॥
पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघाबरोबर हवा तिकडे वाहतो, त्याप्रमाणे मनोरथांच्या ओघाबरोबर ज्याचे मन भटकत असते असे समज.
वाउधणाचिया परी। जो आश्रो कहींचि न धरी।
क्षेत्रीं तीर्थीं पुरीं। थारों नेणे॥
वावटळीप्रमाणे जो कोठे स्थिर राहत नाही व जो क्षेत्रात तीर्थांचे ठिकाणी अथवा सप्तपुर्‍यांपैकी कोण्या एका पुरीत कायम राहण्याचे जाणत नाही.
कां मातलिया सरडा। पुढती बुडुख पुढती शेंडा।
हिंडणवारा कोरडा। तैसा जया॥
माजलेला सरडा जसा झाडाच्या बुंध्यापासून शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा घालतो त्याप्रमाणे ज्याचे भटकणे निरर्थक असते.
जैसा रोविल्याविणें। रांजणु थारों नेणे।
तैसा पडे तैं राहणें। एर्‍हवीं हिंडे॥
ज्याप्रमाणे रांजण जमिनीत रोवल्याशिवाय बसावयाचे जाणत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष पडेल तरच तो एके ठिकाणी राहील नाहीतर तो सारखा हिंडतो.

Manini