Friday, March 28, 2025
HomeमानिनीReligiousDnyaneshwari Adhyay 13 : वाणी ज्ञानेश्वरांची

Dnyaneshwari Adhyay 13 : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि यया वाखाणा। पासीं से आली चौगुणा।
ना म्हणों नयेसि देखणा?। होसी ज्ञानी॥
म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ती आली. तू ज्ञानामध्ये डोळस आहेस, हे नाही म्हणता येत नाही.
तरी आतां ययावरी। प्रज्ञेच्या माजघरीं।
पदें साच करीं। निरूपणीं॥
तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर.
या संतवाक्यासरिसें। म्हणितलें निवृत्तिदासें।
माझेंही जी ऐसें। मनोगत॥
या संतांच्या आज्ञेबरोबर महाराज, माझाही हेतू असाच आहे, असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव यांनी म्हटले.
यावरी आतां तुम्हीं। आज्ञापिला स्वामी।
तरी वायां वागू मी। वाढों नेदी॥
माझाही मूळ हेतू असाच होता यावर महाराज मला तुमचाही तसाच हुकूम झाला, तर आता मी व्यर्थ बोलणे वाढू देत नाही.
एवं इयें अवधारा। ज्ञानलक्षणें अठरा।
श्रीकृष्णें धनुर्धरा। निरूपिली॥
याप्रमाणे ज्ञानाची ही अठरा लक्षणे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितली, ती ऐका.
मग म्हणें या नांवें। ज्ञान एथ जाणावें।
हे स्वमत आणि आघवें। ज्ञानियेही म्हणती॥
यानंतर लक्षणांवरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वत:चे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात, असे श्रीकृष्ण म्हणाले.
करतळावरी वाटोळा। डोलतु देखिजे आंवळा।
तैसें ज्ञान आम्हीं डोळां। दाविलें तुज॥
तळहातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगांनी पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखवले.
आतां धनंजया महामती। अज्ञान ऐसी वदंती।
तेंही सांगों व्यक्ती। लक्षणेंसीं॥
यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना अज्ञान जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणांनी सांगतो.
एर्‍हवीं ज्ञान फुडें जालिया। अज्ञान जाणवे धनंजया।
जें ज्ञान नव्हे तें अपैसया। अज्ञानचि॥
अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल. कारण की जे ज्ञान नाही ते आपोआप अज्ञानच आहे.
पाहें पां दिवसु आघवा सरे। मग रात्रीची वारी उरे।
वांचूनि कांहीं तिसरें। नाहीं जेवीं॥
अर्जुना, असे पाहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीच्या येण्याची वेळ असते, याशिवाय तिसरे काही नसते.

Manini