आणि प्रजा जे जाली। तियें वस्ती कीर आलीं।
कां गोरुवें बैसलीं। रुखातळीं॥
आणि त्याला जी मुलेबाळे झालेली असतात, त्यास तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते तसा तो ज्ञानी प्रजेसंबंधी उदास असतो.
जो संपत्तीमाजी असतां। ऐसा गमे पंडुसुता।
जैसा कां वाटे जातां। साक्षी ठेविला॥
अर्जुना वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टींविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी अनासक्त असतो, तसा सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही तो अनासक्त असल्याचे दिसते.
किंबहुना पुंसा। पांजरियामाजीं जैसा।
वेदाज्ञेसी तैसा। बिहूनि असे॥
फार काय सांगावे? राघू जसा पिंजर्यात असतो तसा जो वेदाज्ञेला भिऊन संसारात असतो.
एर्हवीं दारागृहपुत्रीं। नाहीं जया मैत्री।
तो जाण पां धात्री। ज्ञानासि गा॥
एरवी ज्याचे स्त्रीपुत्रगृहादिकांवर प्रेम नसते, तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज.
महासिंधू जैसे। ग्रीष्मवर्षीं सरिसे।
इष्टानिष्ट तैसें। जयाच्या ठायीं॥
आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय व अप्रिय गोष्टी सारख्या असतात म्हणजे प्रिय गोष्टींनी ज्याला हर्ष होत नाही व अप्रिय गोष्टींनी ज्याला वाईट वाटत नाही.
कां तिन्ही काळ होतां। त्रिधा नव्हे सविता।
तैसा सुखदुःखीं चित्ता। भेदु नाहीं॥
अथवा सकाळ, दुपार व संध्याकाळ या तीन काळी सूर्य जसा तीन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखाचे व दु:खाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचे अंत:करण सुखी अथवा दुखी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही.
जेथ नभाचेनि पाडें। समत्वा उणें न पडे।
तेथ ज्ञान रोकडें। वोळख तूं॥
कोणत्याही ऋतूच्या येण्याजाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही त्याप्रमाणे ज्याचे ठिकाणी प्रिय वा अप्रिय वस्तूंच्या हानी अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही. अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज.
मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि॥
माझ्या ठिकाणी अन्वयपूर्वक अव्यभिचारिणी भक्ती, एकांत प्रदेशात राहणे व जनांच्या समुदायाची खंती.