जरि ज्ञानाचेनि प्रकाशें। परतत्त्वीं दिठी न पैसे।
ते स्फूर्तीचि असे। अंध होऊनी॥
जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याचे ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली, असे म्हणावयास हरकत नाही.
म्हणौनि ज्ञान जेतुलें दावीं। तेतुली वस्तुचि आघवी।
तें देखे ऐशी व्हावी। बुद्धि चोख॥
म्हणून ज्ञान जेवढे दाखवील तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते, परंतु ती ज्ञेय वस्तू पाहील अशी बुद्धी शुद्ध पाहिजे.
यालागीं ज्ञानें निर्दोखें। दाविलें ज्ञेय देखे।
तैसेनि उन्मेखें। आथिला जो॥
याकरिता निर्मळ ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जी पाहते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे.
जेवढी ज्ञानाची वृद्धी। तेवढीच जयाची बुद्धी।
तो ज्ञान हे शब्दीं। करणें न लगे॥
जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झाला आहे, तो ज्ञानाचे रूप आहे, हे शब्दाने सांगावयास नको.
पैं ज्ञानाचिये प्रभेसवें। जयाची मती ज्ञेयीं पावे।
तो हातधरणिया शिवे। परतत्त्वातें॥
ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो.
तोचि ज्ञान हें बोलतां। विस्मो कवण पंडुसुता?।
काय सवितयातें सविता। म्हणावें असें?॥
अर्जुना, तोच ज्ञान आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय? सूर्याला सूर्य म्हणावयाला पाहिजे काय?
तंव श्रोतें म्हणती असो। न सांगें तयाचा अतिसो।
ग्रंथोक्ती तेथ आडसो। घालितोसी कां?॥
तेव्हा श्रोते म्हणाले, ते राहू दे, त्या पुरुषाचे अतिशय वर्णन करू नकोस. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंबा का करतोस?
तुझा हाचि आम्हां थोरु। वक्तृत्वाचा पाहुणेरु।
जे ज्ञानविषो फारु। निरोपिला॥
आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास, हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला.
रसु होआवा अतिमात्रु। हा घेतासि कविमंत्रु।
तरी अवंतूनि शत्रू। करितोसि कां गा?॥
आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करताना त्याचे पाल्हाळ अतिशय रसभरीत करावे ही जी सामान्य कवींची क्लृप्ती तिचा आश्रय जर केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास.