ऐसी दशा येईल पुढें। तैं मन होईल वेडें।
तंव चिंतूनि ठेवी चोखडें। आत्मज्ञान॥
अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडे होईल. तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो.
जैं चोर पाहे झोंबती। तंव आजीचि रुसिजे संपत्ती।
का झांकाझांकी वाती। न वचतां कीजे॥
जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी, अथवा दिवा गेला नाही तोपर्यंत झाकापाक करून ठेवावी.
तैसें वार्धक्य यावें। मग जें वायां जावें।
तें आतांचि आघवें। सवतें करीं॥
त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आताच त्याने सर्व हातावेगळे करून टाकले.
आतां मोडूनि ठेलीं दुर्गें। कां वळित धरिलें खगें।
तेथ उपेक्षूनि जो निघे। तो नागवला कीं?॥
आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्याकडे परत फिरण्यावेळी एखादा प्रवासी प्रवास करीत आला असता त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यातच प्रवेश केला तर तो नागवला जाईल काय?
तैसें वृद्धाप्य होये। आलेपण तें वायां जाये।
जे तो शतवृद्ध आहे। नेणों कैंचा॥
तसे म्हातारपण येईल व जन्माला आलेपण व्यर्थ जाईल. कारण शंभर वर्षे आयुष्य आहे, तेव्हा भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करू असे म्हणणारा तरी शतायू आहे काय?
झाडिलींचि कोळें झाडी। तया न फळे जेवीं बोंडीं।
जाहला अग्नि तरी राखोंडी। जाळील काई?॥
तिळाचे कोळ एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघून गेल्यावर जर ती कोळे झाडली तर त्या कोळाच्या बोंडामधून जसे तीळ निघत नाहीत तसेच अग्नी जरी असला पण तो एकदा राखोंडी झाला मग तो कोणत्याही पदार्थास जाळू शकेल काय?
म्हणौनि वार्धक्याचेनि आठवें। वार्धक्या जो नागवे।
तयाच्या ठायीं जाणावें। ज्ञान आहे॥
त्याप्रमाणे तारुण्यात शक्ती व बुद्धी खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करेल? असे वृद्धावस्थेत होणार्या दुर्दशेचे त्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे.