Wednesday, March 19, 2025
HomeमानिनीReligiousVani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

पैं गा जो ययापरी। जन्मेंचि जन्म निवारी।
मरणें मृत्यू मारी। आपण उरे॥
अर्जुना याप्रमाणे जो या मनुष्यजन्माने भावी जन्माचे निवारण करतो व जो या मनुष्यदेहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्मक्षयातीत अशा स्वरूपाने उरतो.
तया घरीं ज्ञानाचें। सांकडें नाहीं साचें।
जया जन्ममृत्यूचें। निमालें शल्य॥
अशा रीतीने ज्याच्या अंत:करणात जन्ममृत्यू हे काट्यासारखे सलत राहतात, त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काहीच उणीव नसते.
आणि तयाचिपरी जरा। न टेंकतां शरीरा।
तारुण्याचिया भरा। माजीं देखे॥
आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदित असतानाच जो पुढे येणार्‍या म्हातारपणाबद्दल विचार करतो.
म्हणे आजिच्या अवसरीं । पुष्टि जे शरीरीं ।
ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी ॥
तो म्हणतो, आजच्या वेळी (भर तारुण्यात) ही जी शरीरात पुष्टी आहे, ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल.
निदैव्याचे व्यवसाय । तैसे ठाकती हातपाय ।
अमंत्र्या राजाची परी आहे । बळा यया ॥
दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतबट्ट्याचे असतात तसे हातपायांच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील. आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती, प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे.
फुलांचिया भोगा- । लागीं प्रेम टांगा ।
तें करेयाचा गुडघा । तैसें होईल ॥
फुलांच्या (सुवासाच्या) भोगाकरता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो तसे विद्रूप व वास घेण्याला असमर्थ होईल.
वोढाळाच्या खुरीं । आखरुआतें बुरी ।
ते दशा माझ्या शिरीं । पावेल गा ॥
ओढाळ गुरांच्या खुरांनी जसी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते (म्हणजे त्यात कोठे गवत उगवते व कोठे उगवत नाही) त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल.
पद्मदळेंसी इसाळे । भांडताति हे डोळे ।
ते होती पडवळें । पिकलीं जैसीं ॥
कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे, ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात तसे होतील.
भंवईचीं पडळें । वोमथती सिनसाळे ।
उरु कुहिजैल जळें । आंसुवांचेनि ॥
भिवईचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील व अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल.

Manini