ठायीं बैसतिये वेळे। जे रससोय घेऊनि पळे।
तियेचा येरु वोडव मिळे। कोणा अर्था?॥
भोजन करण्याच्या पात्रावर बसायच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते, तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोग?
आघवाचि विषयीं भादी। परी सांजवणीं टेंकों नेदी।
ते खुरतोडी नुसधी। पोषी कवण?॥
इतर सर्व गोष्टीत चांगली परंतु दूध काढण्यावेळी जी कासेखाली बसू देत नाही अशी ती नुसती लाथाडी गाय कोण पोशील?
तैसी ज्ञानीं मती न फांके। येर जल्पती नेणों केतुकें।
परि तें असो निकें। केलें तुवां॥
त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धिविस्तार न पावताना ज्ञानावाचून इतर गोष्टींचे किती पाल्हाळ लावतात ते कळत नाही, परंतु त्यांची गोष्ट राहू दे. तू चांगले केलेस.
जया ज्ञानलेशोद्देशें। कीजती योगादि सायासें।
तें धणीचें आथी तुझिया ऐसें। निरूपण॥
ज्या ब्रह्मज्ञानाच्या अंशाच्या हेतूने लोक योगादिक कष्ट करतात, त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हास मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल?
अमृताची सातवांकुडी। लागो कां अनुघडी।
सुखाच्या दिवसकोडी। गणिजतु कां॥
अमृताची झड एकसारखी सात दिवस लागेना का तिचा कंटाळा यावयाचा नाही. सुखाचे दिवस कोट्यवधी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का?
पूर्णचंद्रेंसीं राती। युग एक असोनि पाहती।
तरी काय पाहत आहाती। चकोर ते?॥
पूर्ण चंद्रासह रात्र एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली तरी चकोरांना ती उजाडावी असे वाटेल काय?
तैसें ज्ञानाचें बोलणें। आणि येणें रसाळपणें।
आतां पुरे कोण म्हणे?। आकर्णितां॥
त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले आता ते व्याख्यान ऐकताना कोण पुरे म्हणेल?
आणि सभाग्यु पाहुणा ये। सुभगाचि वाढती होये।
तैं सरों नेणें रससोये। ऐसें आथी॥
आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशालीच स्त्री वाढणारी असली तर त्यावेळी स्वयंपाकाला संपायचे माहीत नसते.
तैसा जाहला प्रसंगु। जे ज्ञानीं आम्हांसि लागु।
आणि तुजही अनुरागु। आथि तेथ॥
तसा हा प्रसंग झाला कारण की आम्हाला ज्ञानाची प्रीती आहे आणि तुलाही येथे प्रीती आहे.