मळमूत्रद्वारें। होऊनि ठाती खोंकरें।
नवसियें होती इतरें। माझियां निधनीं॥
मलमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील.
देखोनि थुंकील जगु। मरणाचा पडैल पांगु।
सोइरियां उबगु। येईल माझा॥
अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील व मला मरण लवकर येणार नाही आणि सोयर्या-धायर्या लोकांना माझा कंटाळा येईल.
स्त्रियां म्हणती विवसी। बाळें जाती मूर्छी।
किंबहुना चिळसी। पात्र होईन॥
बायका मला पिशाच म्हणतील व मुले मला भिऊन मूर्छित होतील. फार काय सांगावे? मी सर्वांच्या किळसेला पात्र होईन.
उभळीचा उजगरा। सेजारियां साइलिया घरा।
शिणवील म्हणती म्हातारा। बहुतांतें हा॥
शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढासेने होणार्या जागरणामुळे हा म्हातारा पुष्कळांना शिणवील असे ते म्हणतील.
ऐसी वार्धक्याची सूचणी। आपणिया तरुणपणीं।
देखे मग मनीं। विटे जो गा॥
असा पुढे येणार्या म्हातारपणाचा इशारा आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पाहतो आणि मग तो ज्याविषयी मनात विटतो.
म्हणे पाहे हें येईल। आणि आतांचें भोगितां जाईल।
मग काय उरेल। हितालागीं?॥
तो मनात म्हणतो, उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषयभोगात निघून जाईल, मग आपले हित साधण्यास काय उरणार आहे?
म्हणौनि नाइकणें पावे। तंव आईकोनि घाली आघवें।
पंगु न होता जावें। तेथ जाय॥
म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो. आपण पांगळे झालो नाही तोपर्यंत आपणास जेथे जायचे असेल तेथे जातो.
दृष्टी जंव आहे। तंव पाहावें तेतुलें पाहे।
मूकत्वा आधीं वाचा वाहे। सुभाषितें॥
जेथपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले आहे तोपर्यंत जितके पाहावयाचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी चांगले बोलायचे ते बोलून घेतो.
हात होती खुळे। हें पुढील मोटकें कळे।
आणि करूनि घाली सकळें। दानादिकें॥
हात लुळे होतील ही पुढली गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हातांनी दानादि सर्व सत्कृत्ये करून टाकतो.