बऱ्याच लहान मुलांना दूध प्यायला आवडत नाही.पण त्यांच्या शरीरात दूध जावं यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असाल.त्यापैकीच एक म्हणजे दुधासोबत बिस्कीट दिलं जातं. पण त्यामुळे लहान बाळांच्या पचनशक्तीवर याचा परिणाम होतो.त्याचबरोबर सहा महिन्यांनंतरच्या लहान बाळाला खाण्यात सकस आणि पौष्टिक अन्नपदार्थाऐवजी बिस्कीटे खाऊ घालत असाल किंवा दुधात बिस्कीट बुडवून खायला देत असाल, तर त्याला ‘मिल्क बिस्कीट सिंड्रोम’ होण्याची शक्यता सुद्धा असते .
हेही वाचा – गोल्डन मिल्क म्हणजे काय ? काय आहे याचे विशेष महत्व
दुधात बिस्कीट बुडवून खायला दिल्याने त्याला कोणतेच पोषण मिळत नाही.बिस्किटासोबत दूध पोटात जाऊन पोषकत्व मिळेल असा समज असेल तर तसं होत नाही. तज्ज्ञांच्या मते याचा उलट परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. ‘मिल्क बिस्कीट सिंड्रोम’ होण्याची शक्यता जास्त बळावते. त्यामुळे मुलाला बद्धकोष्ठता, पोटदुखी, अशक्तपणा, थकवा, सर्दी, कोरडा खोकला, घसा खवखवणे आदी त्रास होऊ शकतो. तसेच त्याच्या शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाणही कमी होऊ शकते, असा इशारा बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे. बद्धकोष्ठतेने ग्रस्त मुलांपैकी पन्नास टक्के मुलांना ‘मिल्क बिस्कीट सिंड्रोम’ झाल्याचे निरीक्षणही बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.
दूध बिस्किटांऐवजी मुलांच्या आहाराबाबत ही विशेष काळजी घ्यावी
– जंक फूड पूर्णपणे टाळावे.
-आहारात तृणधान्ये, डाळीचे मिश्रण असावे.
– विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांचा समावेश असावा.
– रात्रीच्या वेळी मुलांनी साखर आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे.
– मुलांच्या रात्रीच्या जेवणात आणि झोपेत दोन तासांचे अंतर असावे
-मुलांच्या हट्टानुसार केंव्हाही दूध बिस्कीट एकत्र देऊ नये
लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी शक्यतो घरचे लोक ठरवत असतात. त्यामुळे ही विशेष काळजी पालकांनी घेणं आवश्यक आहे.