हिंदू सणांपैकी अत्यंत महत्वाचा सण म्हणजे होळी. फाल्गुन मासातील पौर्णिमा ही होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी संपूर्ण भारतात होलिका दहन केले जाते. होळी हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या नावाने ओळखली जाते, तर यंदा होळी कधी आहे, इतिहासात होळीशी संबंधित अनेक कथा आणि पौराणिक कथा आहेत. तर होळी कशी साजरी केली जाते पूजाविधी, इतिहास, महत्व आणि मान्यता काय हे जाणून घेऊया
पुजाविधी
होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेला समर्पित करण्यात येते. पूजेनंतर एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे, गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते.
होलिका कथा
पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे. यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधीत झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही, असा एक वर प्राप्त होता. मात्र, भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो, अशी मान्यता आहे.
होलिका दहनाच्या दिवशी हे उपाय करा
होलिका दहनाची रात्र ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असे मानले जाते की होलिका दहनाची राख अत्यंत पवित्र आहे. होलिका दहनानंतर त्याची राख थंड झाल्यावर घरी आणावी. होलिका दहनाची भस्म कपाळावर लावल्याने भाग्य आणि बुद्धिमत्ता तेज होते असे म्हणतात. घरातील कोणाला वाईट नजर लागली असेल तर होलिका दहनाची भस्म तिच्या कपाळावर लावल्याने वाईट नजर दूर होते. राहु आणि केतूच्या महादशा कोणाला त्रास होत असेल तर त्याने होलिका दहनाची भस्म मुठीत घेऊन शिवलिंगावर अर्पण करावी. यामुळे राहू आणि केतूच्या महादशापासून आराम मिळतो. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवसाला धुळवड किंवा धुलीवंदन असे म्हटले जाते. सर्व मित्र, नातेवाईक एकत्र येऊन रंग खेळतात. आपापसातील वैरभाव विसरून मिष्टान्न सेवन केले जाते, रंग खेळले जातात.