हिंदू धर्मात झाडांना विशेष स्थान देण्यात आले आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात झाडांचा किंवा झाडांच्या पानांचा वापर केला जातो. पूजेमध्ये पानांना विशेष मान देण्यात येतो. काही झाडांच्या पानांशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. साधारणत: पूजेमध्ये केळीची पाने, आंब्याची पाने वापरली जातात. पण, याशिवाय अनेक झाडे आणि पाने आहेत, ज्यांना धार्मिक कार्यात विशेष मान असतो.
तुळस –
हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिकदृष्ट्या तुळशीला महत्त्वपूर्ण वनस्पती मानले जाते. भगवान विष्णूला तुळशीची पाने अतिशय प्रिय आहेत, असे म्हणतात. याशिवाय कोणत्याही पूजेत केवळ श्री गणेशाची पूजा सोडून तुळशीच्या पानांना मान असतो.
बेलपत्र –
महादेवांचे आवडते पान म्हणजे बेलपत्र होय. असे म्हणतात की, महादेवांच्या पूजेत बेलपत्र अर्पण केल्याशिवाय अपूर्ण असते. शिवाचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहण्यसाठी दररोज बेलपत्र शिवाला अर्पण करावे.
आंब्याची पाने –
घरात कोणतेही धार्मिक कार्य असल्यास दारावर आंब्याची पानांचे तोरण लावले जाते. याशिवाय लग्नकार्यात मंडपामध्ये आंब्याची पाने वापरली जातात. याशिवाय आपण जेव्हा एखाद्या पूजेत कलशाची स्थापना करतो तेव्हा आंब्याच्या पानांचा वापर करतो.
शमीची पाने –
शमीची पाने धार्मिक कार्यासाठी वापरली जातात. शमीच्या झाडांची पूजा शनि ग्रह मजबूत करण्यासाठी केली जाते. याशिवाय गजाननाच्या पूजेत शमीच्या पानांना मान असतो.
विड्याची पाने –
धार्मिक कार्यात विड्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विड्याच्या पानांवर सूपारी, नाणे, कुंकू आदी गोष्टी ठेवून पूजेत त्याचा वापर केला जातो. देवी लक्ष्मीच्या पूजेत तर आवर्जून त्याचा वापर होतो.
दूर्वा –
श्री गणेशाची पूजा दूर्वांशिवाय अपूर्ण मानली जाते कारण गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहेत.
पिंपळाची पाने –
असे म्हणतात की, पिंपळाची पानांचा हार श्री हनुमानांना अतिशय असतो. याशिवाय हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते.
केळीची पाने –
शास्त्रात केळीच्या पानांना शुभ मानले जाते. सत्यनारायणाच्या पूजेत केळीच्या पानांचा मान असतो. याशिवाय शुभ कार्यात केळीच्या पानांचा मंडप उभारला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केळीच्या पानांचा वापर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी करण्यात येतो.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde