घरदिवाळी 2022दिवाळी अंकांची अखंडित परंपरा !

दिवाळी अंकांची अखंडित परंपरा !

Subscribe

शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रुजलेली दिवाळी अंकांची हि परंपरा अव्याहत चालू आहे. पूर्वी वाचन हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते.

संतोष खामगांवकर

आपल्या महाराष्ट्रातील दिवाळी अंकांच्या आगळ्यावेगळ्या परंपरेला एकशे दहाहून अधिक वर्षे होऊन गेली आहेत. ‘आगळीवेगळी’ असा शब्दप्रयोग यासाठी केला कारण विविध भाषा, धर्म आणि तेवढ्याच विविध संस्कृतींनी समृद्ध असलेल्या आपल्या देशात सणावारांची संख्याही तेवढीच आहे. परंतु एवढ्या सर्व सणांमधून महाराष्ट्रातील दिवाळी हा एकमेव सण आहे, ज्या सणात ‘दिवाळी अंकांची’ खास निर्मिती होते. दर वर्षी वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले ४०० हुन अधिक दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित होतात. हे चित्र इतर कुठल्याही सणांमध्ये पाहायला मिळत नाही.

- Advertisement -

दिवाळी अंकांच्या निमित्ताने नव्या लेखकांना, कवींना, नाटककारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे हा दृष्टिकोन असावा. गेल्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे १९०५मध्ये एक दिवाळी अंक प्रकाशित झाला. बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या ‘मित्रोदय’ मासिकाने ‘नोव्हेंबर दिवाळीप्रित्यर्थ ‘ असा उल्लेख करून हा दिवाळी अंक काढल्याची माहिती इंटरनेटवर मिळते. फक्त चोवीस पानांच्या या अंकात कादंबरी, चरित्रे, वैचारिक निबंध असे भरघोस साहित्य होते. परंतु दिवाळीअंकांच्या सातत्याचा खरा पाय रोवला गेला तो १९०९ साली ‘काशिनाथ रघुनाथ मित्र’ यांनी. मराठीतील पहिला दिवाळी अंक काढण्याचा मान त्यांचाच !

- Advertisement -

काशिनाथरावांचे खरे नाव ‘काशिनाथ रघुनाथ आजगांवकर’ असे होते. बंगाली भाषेवरील प्रेमापायी बंगालीतील ‘मित्र’ हे नाव, त्यांनी टोपणनाव म्हणून स्विकारले . त्यांनी १९०९ साली ‘ मनोरंजन’ दिवाळी अंक काढला. आज मराठी भाषेमध्ये जे काही समृद्ध साहित्य उपलब्ध आहे त्याचा मूळ स्रोत ‘मनोरंजन’ अंकातून निर्माण झालेला आहे.

दिवाळी अंकांमुळे उत्तमोत्तम कथा-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. जयवंत दळवींच्या बहुतेक कादंबऱ्या सर्वात आधी दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झाल्या. व. पु. काळेंसारख्या नामांकित लेखकांनी आपले सुरुवातीचे लेखन दिवाळी अंकांतून केले. पुलंची बटाट्याची चाळ दिवाळी अंकातून लोकांपर्यंत पोचली. चिं. त्र्य. खानोलकरांच्या ‘गणुराया’ आणि ‘चानी’ची ओळख लोकांना दिवाळी अंकांतून झाली. श्री. ना. पेंडसे, दि. ब. मोकाशी, जोत्स्ना देवधर, व्यंकटेश माडगूळकर यांच्या बहुतेक कादंबऱ्या दिवाळी अंकांमधल्याच !… एकूण काय तर ‘मनोरंजन’ने दिवाळी अंकांचा पायंडा पाडला.

का. र. मित्रंनी १९०९ साली काढलेला ‘मनोरंजन’ चा पहिला दिवाळी अंक १९२ पानांचा होता. त्यावेळी त्याची किंमत फक्त १ रुपये होती. मित्रंनी, त्याला अधिकाधिक सचित्र करून आकर्षक केले होते. त्यात ललित वाङ्मयासोबतच शास्त्रीय, सामाजिक, राजकीय विषयांवरील लेख होते. या अंकाचे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे, त्यात असलेला त्यावेळच्या स्त्री- लेखिकांचा समावेश !

त्या काळची स्त्री आजच्यासारखी पुरुषांच्या बरोबरीची मनाली जात नव्हती. तरीही मनोरंजनाच्या पहिल्या दिवाळी अंकात चिमणाबाई गायकवाड, लक्ष्मीबाई टिळक, काशीबाई हेर्लेकर, क्षमाबाई राव, गिरिजाबाई केळकर, कु. मथुराबाई जोशी अशा विदुषींच्या साहित्याचा समावेश होता. मुळातच काशिनाथ मित्र नव्या विचारांचे पुरस्कर्ते असल्यामुळे ‘मनोरंजन’ची निर्मिती त्यांनी त्याच विचारांतून केली होती. साक्षरतेचा अभाव असलेल्या त्या काळातही मनोरंजनचे वीस हजारहून अधिक वर्गणीदार होते.

या पहिल्या दिवाळी अंकापासून दिवाळी अंकांच्या प्रथेमध्ये खंड पडलेला नाही. काळाच्या ओघात पुढे अनेक दिवाळी अंक या प्रवाहात सामील झाले. नव्या संकल्पना, विषय, मांडणी, लेखक, कवी, कादंबरीकार घेऊन हा प्रवास अबाधित राहिला आहे. हल्ली कोणत्याही गोष्टीचा मग ते नाटक असो, सिनेमा असो वा एखादी कलाकृती असो, त्याचा एक ट्रेंड सेट झाला कि त्याच धाटणीची कॉपी होऊ लागते. दिवाळी अंकांबाबत मात्र असे झाले नाही. वेगवेगळे दिवाळी अंक बऱ्याच काळाने, टप्प्याटप्प्याने येत गेले. बराच काळ टिकून राहिलेला ‘किर्लोस्कर’ दिवाळी अंक मनोरंजननंतर साधारणतः दहा वर्षांनी वाचकांना मिळाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यात नियमित लिखाण करीत होते. किर्लोस्कर मधूनच ना. सी. फडकेंना ‘युगप्रवर्तक ‘ कादंबरीकार म्हणून ओळख मिळाली !

दीनानाथ दलाल आणि रॉय किणीकरांचा ‘दीपावली’ हा दिवाळी अंक त्यातील चित्रांसाठी आणि मुखपृष्ठांसाठी गाजला. चित्रकलाविषयक चर्चात्मक लेख त्यात असायचे. अंक सुरु झाल्यापासून सलग पंचवीस वर्षे दीनानाथ दलालांसारख्या चित्रकाराची मुखपृष्ठे दीपावलीला लाभली.

१९२२ साली निर्मित झालेला ‘मौज’ हा सर्वात जुना दिवाळी अंक आहे. मौजने कवींना प्राधान्य दिले. वा. रा. कांत, ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज, शांत शेळके, मंगेश पाडगांवकर , विंदा करंदीकर, वसंत बापट, इंदिरा संत, नारायण सुर्वे आदी दिग्गज कवींनी मौज च्या दिवाळी अंकात नेहमीच हजेरी लावली. र. धो. कर्वे , गं. त्र्य. खानोलकर मौजमध्ये नियमित लिखाण करायचे. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ला मौज मधूनच प्रसिद्धी मिळाली होती.

साठ वर्षांपूर्वी शंकरराव कुलकर्णी यांनी ‘चंद्रकांत’ आणि ‘धनंजय’ हे दिवाळी अंक सुरु केले होते. यातील ‘धनंजय’ तंत्र-मंत्र-रहस्यकथांना समर्पित होता तर ‘चंद्रकांत’ त्यातील कादंबऱ्यांसाठी नावाजला गेला. एकाच अंकात काकोडकरांच्या चार कादंबऱ्या असायच्या. काकोडकर आणि त्यांच्या रोमांचक-रसभरीत कादंबऱ्यांवर तरुण वर्ग फिदा होता. पुढे काकोडकरांनी कुलकर्णींबरोबर फारकत घेतली आणि ‘काकोडकर’ या नावाने स्वतःचाच दिवाळी अंक काढला. पूर्वी काही दिवाळी अंक हे संपादकांचे दिवाळी अंक म्हणून ओळखले जात असत. आचार्य अत्रेंचा ‘नवयुग’, पु. आ. चित्रेंचा ‘अभिरुची’, राम पटवर्धनांचा ‘सत्यकथा’, उमाकांत ठोंबरेंचा ‘वीणा’ , अनंत अंतरकरांचे ‘हंस’, ‘नवल’, ‘मोहिनी’… हि त्याची काही उदाहरणे आहेत.

शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रुजलेली दिवाळी अंकांची हि परंपरा अव्याहत चालू आहे. पूर्वी वाचन हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. पुढे काळ बदलला आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी वाहिन्या, केबल, इंटरनेट असा मनोरंजनाचा आवाका विभागला गेला. छपाईच्या तंत्रज्ञानात बदल झाले. लेटरप्रेस प्रिंटींगवरून ऑफसेट प्रिंटिंग आणि आता डिजिटल प्रिंटिंग…. वीतभर मुठीत मावणाऱ्या मोबाईलमध्ये सर्व काही सामावत चालले आहे. या सर्व बदलांना सामोरे जात दिवाळी अंकांचा प्रवास चालूच आहे. याही दिवाळीत चारशेहून अधिक दिवाळी अंक बाजारात उपलब्ध झालेले आहेत.

यंदा अक्षरधारा दिवाळी अंक संचात ‘अक्षरधारा, एबीपी माझा, अनुभव आणि शब्दरूची’ असे चार दिवाळी अंक उपलब्ध आहेत. ज्यावर रु. ४०० ची पुस्तके मोफत मिळणार आहेत. मॅजेस्टिक दिवाळी संचात ‘दीपावली, मौज, अक्षर, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत दीपोत्सव’ या दिवाळी अंकांसोबत एक पुस्तक मोफत देण्यात येणार आहे. बुकगंगावर विविध दिवाळी अंकांवर १० ते २५ टक्के सूट उपलब्ध आहे. ग्रंथालीने तर एक वेगळीच योजना वाचकांसाठी ठेवली आहे. या योजने अंतर्गत ‘शब्दरूची , एबीपी माझा, ऋतुरंग, पद्मगंधा, मौज’ अशा पाच दिवाळी अंकांसोबत तीस कथा असलेल्या, पाच ऑडिओ क्लिप वाचकांना दिल्या जाणार आहेत. सोबतच प्रथम ३०० सभासदांना ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार आहे. इतर सभासदांना मात्र QR कोडद्वारे हि दिवाळी पहाट डिजिटल माध्यमांवर पाहता येईल !

एकूणच वाचकांसाठी हि दिवाळीसुद्धा घरच्या फराळासोबत साहित्यक फराळाची मेजवानी सादर करीत आहे. इच्छुकांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -