मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना अटक; ३ तारखेपासून होते फरार

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी 4 मे रोजी नाशिक मध्येही मस्जिदीवरील भोंग्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते आंदोलन जास्त यशस्वी होऊ शकले नाही.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले.
कोर्टाने तब्बल ३५हुन अधिक लोकांना जिल्ह्यातून १५ दिवस हद्दपार करण्याचा निर्णय दिला.
मात्र, या सगळ्या दरम्यान मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर हे आंदोलनाच्या आडल्यादिवशी पासूनच नॉटरीचेबल होते. एकीकडे कार्यकर्त्यांना अटक, सुटका, तडीपारी होत असताना शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचे परागंदा होणे कार्यकर्त्यांसाठी सुद्धा निराशाजनक होते. तशी भावनाही त्यांनी खाजगीत बोलून दाखवली.

दरम्यान दातीर यांच्या पूर्वीच्या विधानावरून आंदोलनकर्त्यांना प्रोत्साहन देण्यात दातीर यांचा सहभाग असल्याचे गृहीत धरून पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरही कारवाई केली होती. परंतु दातीर हे कारवाई पासून पळ काढत नॉटरीचेबल होते. आज (दि. ७) रोजी सकाळी युनिट 2 च्या पथकाने दातीर यांना पाथर्डी फाटा येथील स्कायलर्क या हॉटेल मधून ताब्यात घेतले असून त्यांना सातपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.