Corona: मुंबईत आतापर्यंत कोविडच्या १.२० कोटी चाचण्या पार

1.20 crore covid-19 test complete in mumbai
Corona: मुंबईत आतापर्यंत कोविडच्या १.२० कोटी चाचण्या पार

मुंबईत कोविड -१९चा शिरकाव झाल्यापासून ते आजपर्यंत १ कोटी २० लाख ७१ हजार १८५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकीकडे कोविड चाचण्या जास्तीत जास्त करून रुग्णांचा शोध घेऊन उपचार करणे आणि दुसरीकडे कोविड प्रतिबंधक लसीचे डोस देणे या माध्यमातून पालिका आरोग्य यंत्रणेने मुंबईतील कोविड-१९ची पहिली आणि दुसरी लाट परतावून लावण्यात यश मिळवले आहे.

आता कोविड-१९च्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत असली तरी पालिका आरोग्य यंत्रणा लसीकरण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. १६ जानेवारी ते १३ नोव्हेंबर या १० महिन्यांच्या कालावधीत ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्याचे टार्गेट पूर्ण केले आहे. तसेच, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ५९ लाख ८३ हजार ४५२ मुंबईकर नागरिकांनी दुसरा डोस देखील घेतल्याची नोंद झाली आहे.

मुंबईत कोविड-१९च्या संसर्गाला मार्च २०२० पासून सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत कोविडची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली. आता तिसऱ्या लाटेची संभावना व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कोविडला रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने गेल्या २४ तासांत ३३ हजार २७३ चाचण्या केल्या असून आतापर्यंत तब्बल १ कोटी २० लाख ७१ हजार १८५ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच, गेल्या २४ तासांत कोविडबाधित २३८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोविड बाधित रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ६० हजार ६३८ एवढी नोंदविण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासांत कोविडमुक्त रुग्णांची संख्या २७२ असून आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ३९ हजार ७५ एवढी आहे. तसेच, कोविड संसर्गाने बाधित आणि विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ८०८ एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत कोविड संसर्गाने मृत पावलेल्या रुग्णांची संख्या २ असून आतापर्यंत कोविड संसर्गाने १६ हजार ३०२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू (यामध्ये कोविड आणि अन्य आजारानेही काही रुग्ण मृत पावले आहेत) झाला आहे.


हेही वाचा – Coronavirus Vaccine: आता भारतात बूस्टर डोसची तयारी, तज्ज्ञांच्या समितीची पुढील आठवड्यात होणार बैठक!