मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये १० महिने पुरेल इतका पाणीसाठा

water supply to Mumbai

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणात सध्या १२,२१,७८३ दशलक्ष लिटर (८४.४१टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला दररोज होणारा ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा पाहता हा पाणीसाठा पुढील १० महिने (३१७ दिवस) पुरेल इतका म्हणजेच पुढील ३० मे २०२३ पर्यंत पुरेल इतका आहे. गतवर्षीच्या १८ जून रोजी सात धरणात एकूण २,८७,०८२ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. त्यामुळे तुलनात्मक भाग पाहिल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा हा तब्बल जवळजवळ १० दशलक्ष लिटरने जास्त आहे.

मुंबई व ठाणे जिल्हा परिसरात सध्या चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. अद्यापही पावसाळ्याचे दोन महिने दोन आठवडे बाकी आहेत. सध्या मोडक सागर, तानसा व तुळशी हे तिन्ही धरण भरून वाहू लागले आहेत. आता तर मध्य वैतरणा धरणात १,७५,३६२ दशलक्ष लिटर म्हणजेच एकूण क्षमतेच्या ९०.६१ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला असून मुसळधार पावसाचा जोर राहिल्यास सदर धरण २४ तासात भरून वाहू लागेल. तसे झाल्यास भरून वाहणारा धरण म्हणून मध्य वैतरणा हा चौथा धरणअसेल.

समाधानाची बाब म्हणजे सात धरणातील एकूण १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाणीक्षमतेच्या तुलनेत एकट्या भातसा धरणात ५० टक्के पाणीसाठा जमा होतो. आजमितीस या भातसा धरणात ५,८२,२५९ इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यापाठोपाठ अप्पर वैतरणा धरणात ही सध्या १,६४,२४९ दशलक्ष इतका म्हणजेच ७२.३४ टक्के पाणीसाठा जमा आहे.

सात धरणातील पाणीसाठा व टक्केवारी -:

धरण              पाणीसाठा      टक्केवारी

दशलक्ष लि.

उच्च वैतरणा      १,६४,२४९      ७२.३४

मोडकसागर      १,२८,९२५      १००.००

तानसा            १,४४,००५      ९९.२६

मध्य वैतरणा     १,७५,३६२      ९०.६१

भातसा          ५,८२,२५९       ८१.२०

विहार           १८,९३७         ६८.३७

तुळशी          ८,०४६          १००.००

————————————-

एकूण  –      १२,२१,७८३      ८४.४१