मुंबईकरांना दिलासा, १० टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द

जून महिन्यात चांगला पाऊस न झाल्याने मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरात पाणीकपातीचे संकट उभे राहिले होते. मात्र, धरण क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने पाणी पुरवठ्यात १० टक्के कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

no water cut at present in mumbai More than 50 percent water balance in the ponds

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा गेल्या १४ दिवसात १० टक्क्यावरून २५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यावर समाधान व्यक्त करीत मुंबई महापालिकेने २७ जूनपासून लागू असलेली १० टक्के पाणीकपात ८ जुलैपासून रद्द केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपच्या माजी नगरसेवकांनी गुरुवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन १० टक्के पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर आयुक्तांनी २४ तासातच पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला.

यंदा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र गेल्या जून महिन्यात मुंबईत व मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत समाधानकारक व अपेक्षित पाऊस पडण्याऐवजी गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७० टक्के पाऊस कमी पडला व पाणीसाठा घटत जात होता. २४ जून रोजी सात तलावांत १,४२,३८७ दशलक्ष लिटर इतका ( ३६ दिवसांचा) पाणीसाठा होता. त्यामुळे तलावांत अपेक्षित पाऊस पडेपर्यंत शिल्लक पाणीसाठा पुढील काही दिवस नीटपणे होण्यासाठी पालिकेने २७ जूनपासून दैनंदिन पाणीपुरवठ्यात १० पाणीकपात लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, पुढील तीन दिवसांनी मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करून त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली.

दरम्यान, तलाव क्षेत्रात जून अखेर कमी – प्रमाणात पाऊस पडला. तर जुलै महिन्याच्या ३ तारखेपासून मुंबईत व तलाव क्षेत्रात सलग मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ८ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावांत मिळून ३,७५,५१४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

तलावांत २५ टक्के पेक्षाही जास्त पाणीसाठा –

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या ३,७५,५१४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा (२५ टक्के) जमा आहे. मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्याचे चार महिने संपल्यावर म्हणजे १ ऑक्टोबर रोजी तलावातील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येतो. त्यानुसार पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणी साठ्याची आवश्यकता असते. जून महिन्यात अपेक्षित पाऊस तलाव क्षेत्रात पडला नाही. त्यामुळेच मुंबईत २७ जानेवारीपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यामुळे २७ जूनपासून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर ऐवजी ३,४६५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

पाणीसाठ्यात १४ दिवसांत २,३४,१२७ दशलक्ष लिटरने वाढ –

मुंबईत १० टक्के पाणी कपातीची घोषणा २४ जून रोजी करण्यात आली होती. त्यावेळी तलावांत १,४१,३८७ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. हा पाणीसाठा ३,८५० दशलक्ष लिटर दैनंदिन पाणीपुरवठा पाहता पुढील फक्त ३६ दिवस म्हणजे फक्त सव्वा महिना पुरेल इतका होता. मात्र २४ जूनपासून ते ८ जुलै सकाळपर्यन्त पडलेल्या १४ दिवसाच्या पावसामुळे सात तलावांत २,३४,१२७ दशलक्ष लिटर इतक्या पाणी साठ्याची म्हणजेच ६७ दिवसांच्या पाणी साठ्याची ( १० टक्के पाणी कपातीमुळे सध्या दररोज ३,४६५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो) वाढ झाली. सध्या तलावांत जमा झालेला ३,७५,५१४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा हा पुढील १०८ दिवस पूरेल इतका आहे.

सात तलावात २४ जून व ८ जुलै रोजीचा तुलनात्मक जमा पाणीसाठा –

 

तलाव          पाणीसाठा        पाणीसाठा
दशलक्ष लि.      दशलक्ष लि.

२४ जून            ८ जुलै

———————————————————-

उच्च वैतरणा    ०                   ०

मोडकसागर  ४७,०७८         ७०,२८५

तानसा        ७,९२७          ५१,५२९

मध्य वैतरणा १८,०१३         ३४,३५८

भातसा       ६२,४४६        २,०२,३८८

विहार       ३,८३२           १२,०११

तुळशी      २,०९२           ४,९४३
———————————————————-
एकूण     १,४१,३८७          ३,७५,५१४
(९.७७ टक्के)       (२५.९४ टक्के)