अंधेरी कामगार हॉस्पिटल आग घटनेतील दहावा बळी

अंधेरीतील कामगार हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीतील जखमींवर उपचार सुरु असतानाच या जखमींपैकी एका रुग्णाचा २० डिसेंबर रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

government hospital
कामगार रुग्णालय

अंधेरीतील कामगार हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीतील जखमींवर उपचार सुरु असतानाच या जखमींपैकी एका रुग्णाचा गुरुवार, २० डिसेंबर रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. होली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे ६५ वर्षीय दत्तू किसन नरवडे यांचा मृत्यू सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या आग प्रकरणात मृत्यूमुख पडलेल्यांची संख्या आता १० वर गेली आहे. काल, बुधवारीदेखील एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तेव्हा घटनेनंतर आठ आणि उपचारादरम्यान दोन अशा एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा : कामगार रुग्णालयात पुन्हा आग

तीन दिवसांत दोनदा आग 

दरम्यान, काल रात्री अंधेरीतील कामगार रुग्णालयाला पुन्हा एकदा आग लागली होती. गेल्या तीन दिवसांत आगीची ही दुसरी घटना होती. कामगार रुग्णालयाच्या मीटर रुमला आग लागली असून यामुळे येथील स्थानिकांमध्ये पुन्हा भिती निर्माण झाली. मागील दोन दिवस या रुग्णालयाचा वीज पुरवठा बंद होता. काल संध्याकाळी तो सुरु करण्यात आला. वीज सुरु केल्यानंतरच येथील मीटर कक्षाला ही आग लागली असल्याचे समोर आले. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याची माहिती समोर आली. काही वेळेच्या प्रयत्नानंतर अखेर या आगेवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र काही तासांपूर्वीच आग लागलेल्या इमारतीला पुन्हा आग लागल्यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

वाचा : कामगार रुग्णालय आग प्रकरण; ४ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मृतांच्या संख्येत वाढ 

अंधेरीमधील मरोळ या ठिकाणी असलेल्या कामगार रुग्णालयात सोमवारी सायंकाळी आग लागली होती. आग लागताच या ठिकाणी अग्नीशमन दलातर्फे मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. या आगीच्या घटनेमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल उपचारादरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. शीला मार्वेकर असे या महिलेचे नाव असून सेव्हन हिल रुग्णालयात तिचा मृत्यू झाल होता.

वाचा : कामगार रुग्णालयात आग; मृतांचा आकडा ९ वर