घरमुंबईनालेसफाईचा गाळ उचलण्यासाठी ११ कोटींचा खर्च

नालेसफाईचा गाळ उचलण्यासाठी ११ कोटींचा खर्च

Subscribe

नालेसफाईचा गाळ उचलण्यासाठी तब्बल ११ कोटींचा खर्च मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.

पावसाळा सुरु झाला असून पावसाळ्यापूर्वीचे काम ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. याशिवाय रस्त्यांलगतच्या नालेसफाईचे कामही पूर्ण झाले आहे. नाल्यातील काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंत्राटदारांचीच असतानाही रस्त्यांलगतच्या छोट्या नाल्यातील गाळ वाहून नेण्यासाठी आता आणखी १३ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.

मुंबईतील रस्त्यालगतच्या छोट्या नाल्याची सफाई यापूर्वी स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांच्या संस्थाच्यावतीने केली जात असे. परंतु मागील तीन वर्षांपासून रस्त्यालगतच्या छोट्या नाल्यांच्या सफाईच्या कामांसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या पेटीका नाल्यांमधून काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवरच आहे. मोठ्या नाल्यांसह छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी सुमारे ११० कोटी रुपयांच्या कंत्राट कामांना सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रस्त्यावरील फायरबरची झाकणे ठरताहेत मृत्यूचे सापळे

परंतु पावसाळ्याचा सव्वा महिना उलटल्यानंतर रस्त्याकडील छोट्या नाल्यांमधील काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी सात परिमंडळांमध्ये स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यासाठी ११ कोटी १७ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. यासाठी सुपरवेज, भवानी ट्रेडर्स, सनरेज एंटरप्रायझेस, एशियन ट्रेडर्स, भवानी ट्रेडर्स आणि एस. पोळ एंटरप्रायझेस या सहा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. हा गाळ पनवेल रायगडमधील मोसारे, कुन्डेवहळ, वहाळसह भाईंदर नवघर गाव आणि वसई जुचंद्र आदी गावांमध्ये या गाळाची विल्हेवाट लावली जाणार आहे.

गाळाच्या विल्हेवाटासाठी कंत्राटदाराची नेमणूक

मुंबईतील विविध भागातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या छोट्या नाल्यातून काढून जमा केलेला गाळ तसेच ‘स्वच्छ मुंबई’ प्रबोधन अभियान याद्वारे गाळ मुंबई शहराबाहेर घेऊन खासगी जागेवर विल्हेवाट लावण्यासाठी या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आल्याचे पर्जन्यजल विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. रस्त्याकडेला असलेल्या नाल्यातील गाळ महापालिका व ‘स्वच्छ मुंबई’ प्रबोधन अभियान याद्वारे काढला जातो. हा गाळ काढल्यानंतर नाल्याच्या बाजूला सुकवण्यासाठी ठेवला जातो. त्यानंतर हा गाळ वाहून नेला जातो. परंतु पावसाळा सुरु झाला असून रस्त्यालगतचा नाल्यातील गाळही काढण्यात आल्यामुळे महापालिकेने कोणता गाळ वाहून नेण्यासाठी या कंत्राटदारांची नेमणूक केली? असा प्रश्न सर्वांनाच पडू लागला आहे. त्यामुळे नालेसफाईच्या नावावर पुन्हा एकदा ११ कोटींचा खर्च होत असल्याने हा सर्व खर्च गाळात जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -