घरमुंबईमनसुख हिरेन हत्याकांडात ११ जणांचा समावेश

मनसुख हिरेन हत्याकांडात ११ जणांचा समावेश

Subscribe

१४ सिमकार्ड पुरवणारा गुजराती व्यापारी एटीएसच्या ताब्यामध्ये

मनसुख हिरेन हत्याकांडात ११ जणांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अकरा जणांकडे असणारे मोबाईल सिमकार्ड गुजरातमधून घेण्यात आले होते व हे सिमकार्ड मिळवून देणारा गुजरातच्या एका व्यापार्‍याला सोमवारी एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याने एटीएसच्या अटकेत असलेला क्रिकेट बुकी नरेश गोर याला १४ बेनामी सिमकार्ड पुरवल्याची माहिती चौकशीत समोर आलीय. या हत्याकांडात ११ जणांपैकी विनायक शिंदेसह आणखी दोघेजण प्रत्यक्ष दाखल होते. दरम्यान एटीएसच्या पथकाने ठाणे, भिवंडी असे तीन ठिकाणी वाझे यांचे व्यावसायिक कार्यालय आणि गोदाम येथे छापे टाकून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २५ फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती. त्यानंतर ५ मार्च रोजी या स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडी येथे मिळून आला होता. या गुन्ह्याचा तपास एटीएसकडे देण्यात आल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला. या तपासासाठी एटीएसची ६ पथके तयार करण्यात आली आहे. दरम्यान रविवारी एटीएसने मे २०२० मध्ये पॅरोलवर बाहेर पडलेला निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर या दोघांना अटक केली होती. शिंदे याने या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली असून नरेश याने बेनामी सिमकार्ड पुरवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तसेच या सर्वात मुख्य आरोपी म्हणून सचिन वाझे असल्याची माहिती एटीएसने दिली होती.

- Advertisement -

हिरेन हत्याकांडात घटनास्थळी विनायक शिंदे आणि त्याच्यासोबत इतर दोघे असे तिघे जण हजर होते, असेही तपासात पुढे आले आहे. हे दोघे जण कोण त्याच्यासह इतर ९ जणांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान एटीएसच्या एका पथकाने गुजरात राज्यातून बेनामी सिमकार्ड पुरवणार्‍या एकाला ताब्यात घेतले असून त्यांना मुंबईत आणण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्या इसमाने १४ बेनामी सिमकार्ड नरेश गोरला दिले होते व नरेशने हे सिम कार्ड सचिन वाझे आणि विनायक गोर यांना दिले होते.

सचिन वाझे यांच्या कार्यालयासह गोदामावर छापे
एटीएसच्या एका पथकाने सोमवारी सचिन वाझे यांचे ठाण्यातील माजिवडा या ठिकाणी असलेल्या गोल्डन पार्क या इमारतीत असलेल्या मोटो सर्जन या ऑटोमोबाइलच्या कार्यालयात छापे टाकून काही कागदपत्रे तसेच कार्यालयाची झडती घेतली. तसेच हे पथक भिवंडी आणि कशेळी येथील वाझे यांच्या गोदामावर दाखल झाले होते त्या ठिकाणी त्यांनी गोदामाची झडती घेतली असता त्यांना काही महत्वाचे पुरावे हाती लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच एटीएसचे एक पथक सकाळी विनायक शिंदे याला घेऊन मुंब्रा रेतीबंदर येथे घटनास्थळी दाखल झाले होते. त्या ठिकाणी त्यांनी शिंदेकडे मृतदेह कुठे व कसा फेकला होता याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. विनायक शिंदे याच्या घरी एटीएसचे पथक दाखल झाले होते व त्यांनी घराची झडती घेऊन काही महत्वाचे पुरावे ताब्यात घेतले असून त्यात एक संगणक, प्रिंटरचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -