मुंबई : मुंबई महापालिकेकडून गेल्या 10 वर्षात ‘बेस्ट’ उपक्रमास तब्बल 11 हजार 232 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची मदत करण्यात आली आहे. तसेच, मुंबई महापालिकेकडून ‘बेस्ट’ उपक्रमाला नेहमीच मदत करण्यात येत असल्याचा दावा मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केला आहे. शिवसेना (उबाठा) प्रणित बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांनी, आयुक्त बेस्टला मदत करीत नाहीत, असा जो आरोप केला होता तो आयुक्तांनी फेटाळून लावला आहे. (11 thousand crores aid from mumbai municipal corporation to BEST in last 10 years municipal commissioner said)
‘मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम’ (बेस्ट) ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या नागरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईकर नागरिकांचा ‘बेस्ट’ उपक्रमाद्वारे होणारा प्रवास सुखकर, किफायतशीर आणि दर्जेदार व्हावा, यासाठी मुंबई महापालिका या उपक्रमास नेहमीच मदत करीत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व आणि ही वाहतूक व्यवस्था चालविताना येणारी आव्हाने, या सगळ्याची मुंबई महापालिका प्रशासनास पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून महापालिकेकडून ‘बेस्ट’ उपक्रमाला सढळ हस्ते आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे, असा दावा आयुक्तांनी केला आहे. बेस्ट उपक्रमाच्या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी नुकतीच महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्या महापालिका आयुक्त गगराणी यांच्यासमोर मांडल्या. यावेळी, महापालिका प्रशासन हे नेहमीप्रमाणेच ‘बेस्ट’ उपक्रमाच्या पाठिशी खंबीरपणे असल्याचा पुनरूच्चार करत महापालिका आयुक्तांनी कर्मचार्यांना आश्वस्त केले, असा दावा पालिका आयुक्तांच्या वतीने प्रशासनाने केला आहे.
हेही वाचा – BMC : वायू प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करा; मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे यंत्रणांना निर्देश
सन 2019 – 20 ते सन 2023 – 24 या पाच वर्षांच्या कालावधीत मुंबई महापालिकेमधून ‘बेस्ट’ उपक्रमास 8 हजार 594 कोटी 24 लाख रूपये इतका भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यमान आर्थिक वर्षामध्ये महापालिकेने बेस्ट उपक्रमाला 850 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्याव्यतिरिक्त ई – बस खरेदीसाठी आतापर्यंत 493 कोटी रूपये मिळवून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिकेतर्फे बेस्ट उपक्रमातील कर्मचार्यांना बोनस म्हणून या वर्षी 80 कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, आगामी अर्थसंकल्पामध्येही भरीव तरतूद करण्याचे नियोजन चालू आहे, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
बेस्ट उपक्रमाच्या भूमिकेचा विचार करून महापालिकेच्या मलबार हिल येथील भूखंडाचा लिलाव थांबविण्यात आला आहे. तसेच, आवश्यकतेनुसार महापालिकेचे भूखंड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सर्व बाबी विचार घेता, महापालिकेने बेस्ट उपक्रमाची जबाबदारी झटकली आहे, असे म्हणणे न्याय्य होणार नाही. मुंबईची पालकसंस्था म्हणून मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरीता ’बेस्ट’ उपक्रमास महापालिका सातत्याने, यथाशक्ती मदत करत आहे, असा दावाही आयुक्तांनी केला आहे.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar