११ हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

प्रातिनिधिक छायाचित्र

अकरावी प्रवेश प्रक्रियेत आपल्या पसंतीच्या कॉलेजामध्ये प्रवेश मिळावा म्हणून हजारो विद्यार्थी देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत. तर दुसरीकडे पहिल्या पसंतीक्रमाच्या कॉलेजमध्ये प्रवेश जाहीर होऊन ही तब्बल ११ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हे ११ हजार विद्यार्थी मुंबईतील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी आता प्रवेशासाठी सर्व फेर्‍या पूर्ण झाल्यानंतर विशेष फेरी राबविण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केले आहे.

अकरावीच्या पहिल्या यादीत मुंबईतील तब्बल ५८ हजार ८७२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज जाहीर झाले होते. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात जावून प्रवेश घेणे अनिवार्य होते. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यानंतर त्यांना हवे असणारे कॉलेज तेच मिळाले असल्याने अशा विद्यार्थ्यांना दुसरी संधी आणखी कोणती देणार असे स्पष्ट करीत त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे क्रमप्रात्प होते. असे असतानाही मुंबई विभागातील ११ हजार ६७२ प्रवेशच घेतलेला नाही.

अकरावी प्रवेशात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आवडते कॉलेज लागून ही प्रवेश घेतलेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या या निष्काळजीपणाचा फटका अकरावी प्रवेशला बसणार आहे. प्रवेश न घेतल्याने हे विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेपासून बाहेर फेकले गेले आहेत. ६ ऑगस्टच्या विशेष फेरीत या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे तीन फेर्‍यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वच चांगल्या कॉलेजांच्या जागा फुल्ल होतील. त्यामुळे पहिली संधी हुकल्याने त्यांना आता दुय्यम कॉलेजांचा आधार घ्यावा लागणार आहे.