उल्हासनगर पालिका कर्मचाऱ्यांना १२,५०० दिवाळी बोनस!

using fake stamp for shops buying in ulhasnagar
उल्हासनगर महानगर पालिका

उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये दिवाळी बोनस जाहीर झाला असून दिव्यांगांनाही अनुदान देण्यात येणार आहे. मागच्या वर्षी १५ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. मात्र यावेळेस कोविडच्या काळात उत्पन्नात झालेली घट व त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती बेताची झाल्याने ९ हजार रुपये बोनस देण्या बाबत पालिकेने निर्णय घेतला. त्यावर वादविवाद व युक्तिवाद झाल्यावर अखेर १२ हजार ५०० रुपयांवर एकमत झाले.

पालिका व शिक्षण मंडळ असे सुमारे अडीच हजार कर्मचारी उल्हासनगर पालिकेचे असून दिव्यांगांनाही ८४ लाख रुपये अनुदान देण्यात येणार असल्याने पालिकेवर ४ कोटी ५० लाख रुपयांचा ताण पडणार आहे. महापौर लिलाबाई आशान, आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती विजय पाटील, सभागृहनेते भारत गंगोत्री, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, मुख्यालय उपायुक्त मदन सोंडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण, मुख्यलेखा परीक्षक मंगेश गावडे, उपलेखा परीक्षक अशोक मोरे, कामगार नेते चरणसिंग टाक, दिलीप थोरात, राधाकृष्ण साठे, दीपक दाभणे, विलास कवडे, कैलास झालटे, विनोद सुर्यवंशी उपस्थित होते.

‘शिवसेनेला घरचा आहेर’

दरम्यान, कर्मचाऱ्यांना कमी बोनस देण्यात आल्याने शिवसेना शहरप्रमुख व जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांनी डे-नाईट काम केले. अनेक जण बाधित झाले तर काही मृत्युमुखी पडले. अशा जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्यांना १५ हजार रुपयांच्या वर बोनस अपेक्षित होता, अशी प्रतिक्रिया राजेंद्र चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. टीम ओमी कलानी – टीओकेचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी मागच्या वर्षी पंचम कलानी ह्या महापौर असताना त्यांनी १५ हजार रुपये बोनस दिला होता. यावर्षी वाढण्याऐवजी कमी बोनस दिल्याची खंत कमलेश निकम यांनी व्यक्त केली.