घरमुंबईदहिसरमध्ये अक्षय कुमारच्या 'स्पेशल २६'चा सिन; १३ बोगस IT ऑफिसर अटकेत

दहिसरमध्ये अक्षय कुमारच्या ‘स्पेशल २६’चा सिन; १३ बोगस IT ऑफिसर अटकेत

Subscribe

आयकर अधिकारी असल्याची बतावणी करुन एका कुरिअर व्यावसायिकाच्या घरात घुसून सुमारे ८० लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या १३ जणांच्या एका टोळीला दहिसर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत शिताफीने अटक केली. त्यात दोन महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. समीर शंकर केतकर, शैलेश सखाराम पवार, कुंदन गंगाधर गावडे, प्रभाकर दत्ताराम पालांडे, अजय ऊर्फ आनंद रघुनाथ जाधव, नरेंद्र सहदेव मर्चंडे, संतोष ऊर्फ पप्पू उदयनारायण दुबे, राजेंद्र केसरीप्रसाद निशाद, अल्ताफ मोहम्मद कागदी ऊर्फ समीर टोपी, सुजीत विनोद सोनी, अ‍ॅन्थोनी थॉमस बडकेन, बबिता अमरसिंग चौहाण आणि कुमूदिनी ज्ञानोबा बढे अशी या १३ जणांची नावे आहेत. अटकेनंतर सर्व आरोपींना बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना सोमवार १७ जूनपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

किसन दगडू बेलवटे हे दहिसर येथील ओवरी पाडा, गंगोत्री वृंदावनजवळील बी/१०४ मध्ये राहतात. त्यांचा पूर्वी कुरिअरचा व्यवसाय होता. मात्र व्यवसायातील मंदीमुळे त्यांनी हा व्यवसाय बंद केला होता. त्यांनी त्यांच्या गावी मोठ्या प्रमाणात शेतजमीन खरेदी केली होती. अलीकडेच त्या जमिनीची विक्री करुन त्यांनी घरी काही पैसे आणले होते. शनिवारी ८ जूनला पहाटे साडेचार वाजता त्यांच्या घरी आठ ते दहाजण आले. या सर्वांनी आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन सहकार्य करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना तुमच्याकडे ठेवलेले सर्व अवैध पैसे जप्तीसाठी सादर करा आणि कारवाईसाठी तयार रहा, अशी धमकी देऊन त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

यावेळी किसन बेलवटे यांनी शेतजमिनीच्या विक्रीतून आलेली ८० लाख ४० हजार रुपयांची कॅश, तसेच एक लाख बारा हजार रुपयांचे चार महागडे मोबाईल असा ऐवज ताब्यात घेऊन त्यांना आयकर विभागात येण्यास सांगितले. या घटनेने किसन बेलवटे यांना प्रचंड धक्का बसला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने त्यांना काहीच सुचले नाही. त्यानंतर त्यांनी हा प्रकार त्यांच्या परिचित दिपकभाई शाह यांना सांगितला. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तोतयेगिरी करुन फसवणुक तसेच लुटमारीचा गुन्हा नोंदविला. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश दिले होते. या घटनेनंतर पोलिसांनी इमारतीसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले. या फुटेजमध्ये संबंधित आरोपी दोन कारसह रिक्षातून पळून गेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, एसीपी राजाराम प्रभू, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, जितेंद्र कदम, गोरखनाथ घार्गे, चंद्रकांत घार्गे, श्रीकांत मगर, शिवाजी चौरे, संदीप शेवाळे, खोत, परब, जगताप, पांगे, शेख, तटकरे, उगले, पोळ, शिरसाठ, केळजी, सांबरेकर, मोहिते, हिरेमठ, लहांगे, सागर पवार, अनुसया जाधव, साक्षी जाधव यांनी आरोपींचा शोध सुरु केला.

- Advertisement -

ही शोधमोहीम सुरु असताना अंधेरी येथून रिक्षाचालक समीर केतकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर वेगवेगळ्या परिसरातून दोन महिलांसह इतर बारा आरोपींना पोलिसांनी अटक केली. तपासात समीरनेच बोगस आयकर विभागाचे ओळखपत्र तयार केल्याचे उघडकीस आले. ही माहिती त्याने अजय जाधव याला दिली. तो पूर्वी दिपकभाई शहा यांच्याकडे चालक म्हणून काम करीत होता. या दोघांकडून ही माहिती समीरला मिळताच त्याने संपूर्ण कटाची योजना बनविली होती. या कटात त्याने दोन महिलांना सामिल करुन घेतले. त्यानंतर ते सर्वजण किसन बेलवटे यांच्या घरी गेले. त्यांना आयकर विभागाचे ओळखपत्र दाखवून घरातून कॅशसहीत मोबाईल असा ऐवज घेऊन पलायन केले, मात्र या सर्व आरोपींना अवघ्या ४८ तासांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे आणि त्यांच्या पथकाने शिताफीने अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -