HomeमुंबईBoat Accident : बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू; 101 जणांची सुटका; मुख्यमंत्री...

Boat Accident : बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू; 101 जणांची सुटका; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Subscribe

नागपूर : एलिफंटा बेटावर जाणारी प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियाजवळ दुपारी उलटली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून 101 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मृतांच्या वारसाला पाच लाख रुपये देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली. (13 killed in boat accident 101 rescued; Chief Minister Devendra Fadnavis gave information)

गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटा बेटाला जाणारी नीलकमल ही खासगी प्रवासी बोट उलटली. अपघात झाल्याचे दिसताच परिसरातील इतर बोटी मदतीसाठी धावल्या. या अपघातातून 101 प्रवाशांना वाचवण्यात यश आले. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यात नौदलाचे तीन आणि 10 नागरिकांचा समावेश आहे.

गेट वे ऑफ इंडिया तसेच एलिफंटा बेटावर जाण्यासाठी दररोज पर्यटक येत असतात. बुधवारी नीलकमल ही खासगी नौका 80 प्रवाशांना घेऊन गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान प्रवास करत होती. यावेळी नेव्हीच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला बुचर आयलंडजवळ धडक दिली आणि अपघात घडला. ही प्रवासी बोट उरण, कारंजाजवळ उलटली.

यासंदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. तसेच सभागृह संपल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना याची माहिती दिली. यावेळी 13 जणांचा मृत्यू झाला असून बोटीवरील 101 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे. बचावकार्य अजून सुरू असून उद्या सकाळी यासंदर्भातील अजून माहिती मिळेल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात 13 जणांचा मृत्यू झाला असून यात नौदलाचे तीन अधिकारी आणि 10 नागरिकांचा समावेश आहे. यातील गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नौदलाने तत्काळ बचावकार्य हाती घेतले याची अंतिम माहिती उद्यापर्यंत हाती येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, नीलकमल बोट व्यवस्थित चालली होती. मात्र, नौदलाचे अधिकारी नव्या इंजिनची टेस्ट ते घेत होते. ते टेस्टिंग सुरू असतानाच बोटीच्या इंजिनचा प्रॉब्लेम झाला आणि ती बोट नीलकमलला जाऊन धडकल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar