गावावरुन परतणाऱ्यांनाही १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावं लागणार; मुंबई मनपाचा निर्णय

bmc building
मुंबई महानगरपालिका

मुंबईत कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आले असताना आता मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच सुशांत सिंह प्रकरणात केलेली चूक देखील यावेळी महापालिकेने सुधारली आहे. यापुढे मुंबईत बाहेरून येणाऱ्या सर्वांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. यामध्ये राज्यातल्या राज्यात गेलेल्या नागरिकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे गणपतीसाठी गावाला गेलेल्या चाकरमान्यांना पुन्हा मुंबईत आल्यानंतर घरातच १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांकडून आयपीएस अधिकारी विनय तिवारी आले होते. मात्र त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेवर बरीच टीका झाली होती. तिवारी यांना क्वारंटाईन केले असताना इतरांना का मोकळे सोडले? असाही प्रश्न विचारण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत येणाऱ्या किंवा परतणाऱ्या सर्वांनाच १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

अनलॉकची सुरुवात झाल्यानंतर अनेकजण मुंबई सोडून गावी गेले होते. तसेच २२ ऑगस्ट रोजी येणाऱ्या गणेश चतुर्थीसाठीही अनेक मुंबईकर कोकणात जाणार आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात मुंबईत मोठ्या प्रमाणात मुंबईकर परतण्याची शक्यता आहे. आटोक्यात आलेला कोरोनाचा संसर्ग बाहेरून आलेल्या लोकांमुळे पुन्हा फैलावू नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून हा खबरदारीचा उपाय म्हणून राबविला जात असल्याची माहिती मिळत आहे.