Cyclone Tauktae: बॉम्बे हायजवळ बार्ज P305 मध्ये १४६ कर्मचाऱ्यांची नौदलाकडून सुटका

मुंबईसह कोकणात तौत्के चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) अक्षरश: थैमान घातले. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले. या वादळादरम्यान बॉम्बे हायजवळ डायमंड ऑईल फील्ड जवळील एका बार्ज P 305 मध्ये तब्बल २७३ कर्मचारी अडकल्याचे वृत्त होते. ही माहिती मिळताच नौदलाने बचाव कार्य सुरू केले. P 305 या बार्जवर एकूण २७३ कर्मचारी उपस्थित होते त्यापैकी आतापर्यंत १४६ कर्मचाऱ्यांची नौदलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, P 305 या बार्जवर एकूण २७३ कर्मचारी उपस्थितीत होचे. ज्या ठिकाणी हे कर्मचारी आहे ते ठिकाण मुंबईपासून जवळपास ७० किलोमीटर दक्षिण पश्चिम परिसरात आहे. नौदलाच्या आयएनएस कोची, आयएनएस तलवार आणि आयएनएस कोलकाता यांच्यामार्फत डायमंड ऑईल फील्डच्या ठिकाणी बेपत्ता झालेल्या P 305 बोटीचा शोध आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. चक्रीवादळामुळे सोमवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने देखील कहर केले होते. दरम्यान, खवळलेला समुद्र आणि जोरदार उंच लाटा यामुळे नौदलाला हे बचाव कार्य करताना अनेक अडचणी येत होत्या. बॉम्बे हाय परिसरात असणाऱ्या डायमंड ऑईल फील्डमध्ये पी-305 वरील कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यासाठी नौदलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बॉम्बे हायजवळ डायमंड ऑईल फील्ड जवळील बार्ज P 305 मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी INS कोचीला पाठवण्यात आल्याची माहिती नौदलाकडून सांगण्यात आली तर या सर्व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आणि मदतीसाठी आयएनएस तलवार सुद्धा तैनात करण्यात आली होती.