Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे ठाण्यात मुंबईच्या जलवाहिनीला पुन्हा भगदाड; एक महिना १५ टक्के कपात

ठाण्यात मुंबईच्या जलवाहिनीला पुन्हा भगदाड; एक महिना १५ टक्के कपात

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील धरणांमधून मुंबईला ( काही प्रमाणात ठाणे क्षेत्रात) पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला कूपनलिका खोदकाम करताना मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्याकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील धरणांमधून मुंबईला (काही प्रमाणात ठाणे क्षेत्रात) पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला कूपनलिका खोदकाम करताना मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्याकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई व ठाणे महापालिका क्षेत्राला होणाऱया पाणीपुरवठ्यात ३१ मार्चपासून पुढील ३० दिवस म्हणजे २९ एप्रिलपर्यंत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. (15 percent water cut due to Mumbai water channel Break Again In Thane)

ठाणे येथील कोपरी पुलाजवळ काही दिवसांपूर्वीच ठाणे महापलिकेतर्फे नवीन पुलाचे काम सुरु असताना कामगारांच्या हलगर्जीपणामुळे, ठाणे जिल्ह्यातील धरणांमधून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई महापालिकेची २,३४५ मिलीमीटर व्यासाची ‘मुंबई २’ जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे त्यावेळीही लाखो लिटर पाणी वाया गेले होते.

- Advertisement -

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम ९ ते ११ मार्च या कालावधीत करण्यात आले होते. त्यावेळीही दुरुस्ती कालावधीत म्हणजे ४८ तास १० टक्के पाणीकपात मुंबईकरांवर लादण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ठाणे हद्दीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला भगदाड पडल्याने व दुरुस्ती कामासाठी मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणी कपातीच्या संकटाला तब्बल एक महिना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईकर या सर्व घटनाप्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

मुंबई महापालिका अंतर्गत मुंबई शहर व उपनगराच्‍या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्‍के पाणीपुरवठा हा भांडुप संकूल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्‍के पाणीपुरवठा मुख्‍यत्‍वे ५,५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या १५ किलोमीटर लांबीच्‍या जलबोगद्याद्वारे होतो. या जल बोगद्यास ठाणे येथे कूप‍नलिकेच्‍या खोदकामामुळे हानी पोहचल्याचे मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्याला निदर्शनास आले आहे. या हानीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. पर्यायाने ही पाणी गळती दुरुस्‍तीसाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करणे व दरम्‍यानच्‍या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडूप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचविणे आवश्‍यक आहे. पर्यायी पाणीपुरवठा व्‍यवस्‍था कार्यान्वित करण्‍यासाठी काही अत्‍यावश्‍यक बदल करणे गरजेचे झाले, असे पालिकेने म्हटले आहे.

- Advertisement -

या कारणाने, वहन व्‍यवस्‍थेत बदल सुरु असताना व जलबोगदा दुरुस्‍तीच्या काळात मुंबई शहर व उपनगराचा पाणीपुरवठा बाधित होणे अटळ आहे. पर्यायी व्‍यवस्‍थेला देखील काही तांत्रिक कारणास्‍तव पूर्ण क्षमतेने वापरासाठी मर्यादा आहेत. त्यामुळे सध्‍या भांडुप संकुल येथे प्रक्रिया होत असलेल्‍या प्रमाणाइतके पाणी पोहचविणे व प्रक्रिया करणे शक्‍य होणार नाही.

या सर्व बाबी लक्षात घेता, मुंबई महापालिका क्षेत्रासाठी व पालिकेतर्फे ठाणे शहरास होणाऱया प्रक्रियायुक्‍त पाणीपुरवठ्यात ३१ मार्चपासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस कालावधीसाठी १५ टक्‍के कपात करण्‍यात येणार आहे. त्यामुळे, मुंबई शहर व उपनगर परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


हेही वाचा – हिंदू आक्रोश मोर्चावरून मुस्लीम विचारवंतांचे मोहन भागवतांना पत्र; वाचा नेमके प्रकरण काय?

- Advertisment -