डहाणूजवळ मालगाडीच्या डब्यांना भीषण आग

डहाणू- वाणगाव हद्दीत मालगाडीच्या दोन डब्यांना भीषण आग लागली. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.

dahanu-road-bogies
मालगाडीचे डबे जळाले (सौजन्य-एएनआय)

मुंबई – अहमदाबाद मार्गावरील डहाणू- वाणगाव हद्दीत मालगाडीच्या दोन डब्यांना भीषण आग लागली. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. गुरुवारी, ८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा १०.३० च्या सुमारास डहाणू- वाणगाव या स्थानकादरम्यान मालगाडीच्या दोन डब्यांना भीषण आग लागली. सुरतहून जेएनपीटीकडे जात असताना ही घटना घडली. दरम्यान, या घटनेमुळे गुजरात-मुंबईदरम्यानची वाहतूकदेखील विस्कळीत झाली असून, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय, गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या असून मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे.

प्लास्टिकचे ग्रेनील असल्याने आग पसरली

ओव्हरहेड वायर तुटून तेल असलेल्या डब्यांना आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डब्यात प्लास्टिकचे ग्रेनील असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, ओव्हरहेड वायर आणि रुळाचे नुकसान झाले आहे. यामुळे डहाणू- विरार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.