हरिहरेश्वर समुद्रकिनारी २ संशयास्पद बोटी

३ एके-४७ आणि काडतुसे आढळल्याने खळबळ, मुंबईसह आसपासच्या परिसरात हाय अलर्ट, सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर समुद्रकिनारी गुरुवारी सकाळी एका संशयास्पद बोटीत ३ एके-४७, काडतुसे आणि काही कागदपत्रे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. याशिवाय श्रीवर्धनमधील भरडखोल येथेही एक बोट संशयास्पदरित्या आढळली आहे. या बोटीमध्ये लाईफ जॅकेट आणि काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत.सणांच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा संशय व्यक्त होऊ लागल्याने रायगडसोबतच मुंबई व आसपासच्या परिसरात  ताबडतोब हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शस्त्रास्त्रे आढळून आलेली ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची आहे. मस्कतहून युरोपकडे जाणार्‍या या बोटीचे इंजिन बिघडल्याने ती भरकटून रायगडच्या समुद्रकिनार्‍यावर तरंगत आली. यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. पोलिसांनी दोन्ही बोटी जप्त केल्या आहेत. बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नसला, तरी याप्रकरणी तपास करणार असल्याची माहिती पोलीस आणि एटीएसने दिली आहे.

यासंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, एक १६ मी. लांबीची स्पीड बोट रायगडमधील श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर किनार्‍यावर संशयास्पद स्थितीत दोन ते अडीच सागरी मैल अंतरावर समुद्रात तरंगताना मच्छीमारांना दिसली. या बोटीत एकही व्यक्ती नसल्याने या बोटीची माहिती स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर मच्छीमारांच्या मदतीने ही बोट किनार्‍याला लावण्यात आली असता बोटीत ३ एके-४७, काडतुसे आणि काही कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर तत्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला.

मस्कतहून युरोपकडे जाताना भरकटली बोट
या बोटीबाबत तत्काळ भारतीय तटरक्षक दल व इतर संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बोटीचे नाव ’लेडीहान’ असून ऑस्ट्रेलियन हाना लॉर्डरगन महिलेच्या मालकीची ही बोट आहे. तिचा पती जेम्स हॉबर्ट हा बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती, मात्र २६ जून रोजी सकाळी १० वाजता बोटीचे इंजिन निकामी झाल्याने खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास एका कोरिअन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका करीत त्यांना ओमानला सुपूर्द केले, परंतु खवळलेल्या समुद्रामुळे बोटीचे टोईंग करता आले नाही. परिणामी समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे ही बोट भरकटत हरिहरेश्वर किनार्‍याला लागली.

केंद्रीय पथकाचा तपास सुरू
स्थानिक पोलीस आणि दहशतवादविरोधी पथक मिळून याप्रकरणी तपास करीत आहेत. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्था यांच्याशी सतत संपर्क सुरू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, १२ मार्च १९९३ रोजी मुंबईतील हादरवून सोडणार्‍या साखळी बाँम्ब स्फोटांसाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स तालुक्यातील शेखाडी बंदरातून उतरविण्यात आले होते. तब्बल २९ वर्षांनंतर शस्त्रास्त्रांसह भरकटलेल्या बोटीमुळे श्रीवर्धन पुन्हा एकदा चर्चेत आले. मात्र या बोटीबाबतचा उलगडा झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी ते रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे या ५२ किलोमीटरच्या टापुत सागरी पोलिसांची गस्त असते. मात्र हा भाग तस्करी किंवा विघातक कारवायांसाठी सोयीचा ठरण्याची शक्यता असल्याने या भागात अलिबाग, मुरुडप्रमाणे तटकरक्षक दलाची गस्त सुरू करण्याची मागणी होत आहे.

बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही- फडणवीस
हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही.या प्रकरणाची पुढील चौकशी स्थानिक पोलीस आणि राज्य गुन्हे अन्वेषण पथक करत आहे. सध्या दहीहंडी, गणेशोत्सव पहाता राज्यात ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला असून आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.