घरमुंबईमुंबई पालिका निवडणूक प्रभाग आरक्षणाविरोधात २३२ हरकती, ६ जूनला २०७ हरकती

मुंबई पालिका निवडणूक प्रभाग आरक्षणाविरोधात २३२ हरकती, ६ जूनला २०७ हरकती

Subscribe

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी प्रभाग आरक्षण सोडत लॉटरी पद्धतीने काढण्यात आली. या प्रभाग आरक्षणाविरोधात आक्षेप घेत काँग्रेससह विविध राजकीय पक्ष, एनजीओ आदींनी तब्बल २३२ हरकती व सूचना निवडणूक विभागाकडे नोंदविल्या आहेत. या हरकती व सूचनांवर पालिका आयुक्त इकबाल चहल हे निर्णय घेणार असून त्यानंतर त्यावर पुढील प्रक्रिया करून त्या अंतिम करण्यात येणार आहेत. १३ जून रोजी राजपत्रात अंतिम प्रभाग आरक्षणाबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई महापालिकेने यंदाच्या निवडणुकीसाठी २२७ ऐवजी २३६ प्रभाग निर्माण केले आहेत. या २३६ प्रभागामधून ३१ मे रोजी वांद्रे, रंगशारदा येथे लॉटरी सोडत काढून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला प्रभाग यांसाठी प्रभाग आरक्षित करण्यात आले होते. मात्र या प्रभाग आरक्षणांवर सर्वात प्रथम मुंबई काँग्रेसतर्फे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी त्यांचा प्रभाग महिला प्रभाग म्हणून आरक्षित झाल्याने जोरदार हरकत घेत विरोध दर्शविला होता. त्यानंतर रवी राजा व मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये सदर विषय उपस्थित करीत आक्रमक पवित्रा घेतला होता. काँग्रेसच्या २९ माजी नगरसेवकांच्या प्रभागापैकी २१ प्रभगात महिला आरक्षण पडल्याने हा योगायोग नसून यात काहीतरी काळेबेरे असून आयुक्तांनी काँग्रेसला संपविण्याची सुपारी घेतल्याचा मोठा खळबळजनक आरोपही या काँग्रेस नेत्यांनी जाहीरपणे केला होता. तसेच, या प्रभाग आरक्षणाच्या विरोधात हरकती – सूचना मांडणार असल्याचे सांगितले होते. त्यावर योग्य निर्णय न झाल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही या काँग्रेस नेत्यांनी दिला होता. त्यानुसार काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांनी आपल्या हरकती व सूचना नोंदविल्या असल्याची माहिती रवी राजा यांनी दिली.

- Advertisement -

शेवटच्या दिवशी २०७ हरकती व सूचना –

महापालिका निवडणूक विभागाकडे २ जूनपर्यन्त फक्त ३ हरकती व सूचना आल्या होत्या. तर १ ते ५ जून या कालावधीत त्यात २३ ने वाढ होऊन त्या हरकती व सूचना २५ पर्यन्त नोंदविण्यात आल्या होत्या. मात्र ६ जून रोजी एकाच व शेवटच्या दिवशी तब्बल २०७ हरकती व सूचना निवडणूक विभागाकडे नोंदविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -